

प्रवीण माळी
तासवडे टोलनाका : शेंद्रे ते कागल या पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरणाचे काम सुरू असताना गावात जाणाऱ्या भुयारी पुलांकडे महामार्ग प्राधिकरणाने गंभीर दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर येत आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी अनेक ठिकाणचे भुयारी पूल अजूनही जुन्याच चौपदरी मापाचे असल्याने हे पूल आता थेट ‘मृत्यूचे सापळे’ ठरत आहेत. अंदाज न आल्याने वाहने थेट भुयारी पुलांच्या कठड्यांवर आदळत असून आर्थिक नुकसानाबरोबरच जीवितहानीचीही भीती वाढली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून शेंद्रे ते कागल या पट्ट्यात महामार्ग रुंदीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. या रेंगाळलेल्या कामाचा फटका केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर स्थानिक नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. सततची वाहतूक कोंडी, अर्धवट खणलेले नाले, विस्कळीत सेवा रस्ते, मनमानी वाहतूक वळवणे यामुळे अनेक अपघात घडले आहेत. काहींना आपले हातपाय गमवावे लागले असून काहींनी प्राणही गमावले आहेत. 2004 साली पुणे-बेंगलोर महामार्गाचे चारपदरी रुंदीकरण झाले होते. त्या वेळी कराड ते सातारा दरम्यान गावकऱ्यांसाठी महामार्गाखाली पुरेशा रुंदीचे भुयारी पूल बांधण्यात आले होते. मात्र, 2023 पासून सुरू असलेल्या सहापदरी रुंदीकरणात महामार्ग रुंद केला असताना, गावात जाणाऱ्या भुयारी पुलांचे रुंदीकरण करण्यात आले नाही. परिणामी हे पूल आजही जुन्याच चौपदरी मापाचे असून त्यावरून एकावेळी दोनच वाहने नीट जाऊ शकतात, तर तीन वाहने अक्षरशः एकमेकांना घासत जात आहेत.
कराड तालुक्यातील गोटे, खोडशी, वनवासमाची, वहागाव, बेलवडे हवेली, वराडे आदी गावांतील भुयारी पुलांची हीच अवस्था आहे. महामार्गाच्या कडेला प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या अरुंद पुलांच्या कठड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. महामार्ग पूर्ण झाल्यानंतरही ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात गंभीर दुर्घटनांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.