

मुंबई ः सातारा येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने भाईंदर आणि आसामचे रहिवाशी असलेल्या कुी विला चेरियाण, कायम सय्यद ऊर्फ सद्दाम, राजीकुल रेहमान आणि हाविजुल इस्लाम या चार आरोपींना शुक्रवारी रात्री उशिरा वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.
आरोपींना रविवारी किल्ला न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील काही मुख्य आरोपीसह इतर आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
9 ऑक्टोंबरला सलीम शेख आणि रईस शेख या दोघांना गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने अटक केली. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 136 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्यांच्या चौकशीतून विशाल मोरे याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने विशालला पुण्यातून अटक केली. चौकशीत सलीम आणि रईस हे दोघेही विक्रोळीचे तर विशाल पुण्याचा रहिवाशी असून विशालने त्यांना एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते. सातारा येथून विशालने एमडी ड्रग्ज आणले होते. याच ड्रग्जची तो त्याच्या सहकाऱ्याचंया मदतीने मुंबईसह इतर शहरात विक्री करत होता. त्यांच्या चौकशीत सातारा येथील जावळी, बामनोलीच्या सावरीगावात एका शेतातील प्लॅस्टट नसलेल्या विटांच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी साडेसात किलो एमडी ड्रग्ज, 38 किलो एमडीचे लिक्वीड आणि इतर कच्चा माल असा सुमारे 115 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता. तपासात आरोपींनी शेतातील एका जागेवर शेड बांधून तिथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांतील भाईंदर आणि आसाममधील काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.