

बामणोली : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील बामणोलीजवळील सावरी गावच्या हद्दीतील जळका वाडा म्हणून परिचित असणाऱ्या एका शेडमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने शनिवारी पहाटे एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड टाकली असून अंदाजे 20 ते 25 कोटींच्या ड्रग्जचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे.
या कारवाईत 7 किलो 818 ग्रॅम एमडी ड्रग्ज व 38 किलो 820 ग्रॅम लिक्विड जप्त करण्यात आल्याचे समोर येत आहे. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असून साताऱ्याचे कोणीही पोलिस अधिकारी कारवाईची अधिकृत माहिती द्यायला समोर येत नाही. संबंधित वाड्यात ड्रग्जची निर्मिती, कच्च्या मालाचा साठा केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी तीन परप्रांतीयांना ताब्यात घेतले असून हा वाडा सील करण्यात आला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असून यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे.
बामणोली ग्रामपंचायती अंतर्गत असणाऱ्या सावरी गावच्या हद्दीत गोविंद बाबाजी सिंदकर यांचा जळका वाडा आहे. हा वाडा वर्षभरापूर्वी वणवा लागल्याने त्यामध्ये जळाला होता. त्यामुळे या वाड्यात सध्या कुणाचेही वास्तव्य नाही. गोविंद सिंदकर हा बामणोली गावातील घरामध्ये रहात असल्यामुळे या जळक्या वाड्याकडे कोणीही फिरकत नसे. पूर्वी या ठिकाणी म्हशींचा गोठा होता. या वाड्यातच एमडी ड्रग्जचा साठा सापडला आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने शनिवारी पहाटे अचानक धडक मारली. पाच ते सहा वाहनातून सुमारे 20 ते 25 पोलिसांचा ताफा भल्या पहाटे थंडीतच सावरी गावात पोहोचला. या पथकाने या जळक्या वाड्याचा ताबा घेत छापेमारी सुरू केली. त्यावेळी या वाड्यात ड्रग्जची फॅक्टरीच असल्याचे उघडकीस आले.
आतमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेली काचेची भांडी, इलेक्ट्रिक मशिन, प्लास्टिक टफ, ट्रे असे साहित्य आढळून आले असून या प्रक्रियेसाठी संशयित चोरून लाईट वापरत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे तयार केलेले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज अन्यत्र विक्री केल्याची माहितीही मिळत आहे. मात्र, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सायंकाळी जप्त केलेले साहित्य घेवून मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा रवाना झाले. वाड्यात राहणाऱ्या तीन परप्रांतियांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांना अधिक चौकशीसाठी नेले.
कारवाईत ड्रग्जचे 20 ते 25 कोटींचे घबाड पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने वाड्यात झाडाझडती घेतली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा नक्की झाला कधी?, या प्रकरणातील संशयितांची साखळी कुठपर्यंत आहे?, या साखळीत आणखी कोण कोण आहे? अशा अनेक प्रश्नांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांसोबत उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, सातारा एलसीबीचे पोनि अरुण देवकर, मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि सुधीर पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारीही दाखल होते.