

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांत नशेली पदार्थांचा विळखा घट्ट होत चालला आहे. व्हायटनरवर झिंगणारी तरुणाई पुढे गांजाची बांटा गोळ्या खात आता तर थेट मेफेड्रॉन ड्रग्ज, नशेली इंजेक्शन घेऊ लागली आहेत. जिल्ह्यात एकीकडे गांजा पिकत असताना दुसरीकडे मेफेड्रॉनसारखी नशेली पदार्थ बनवण्याचा अड्डाच थाटल्याचे सावरी गावामुळे समोर आले आहे. दरम्यान, प्रभावी कारवाई होत नसल्याने त्याचा केवळ बुडबुडा होत असल्याने तरुणाई देशोधडीला जावू लागली आहे.
व्यसनमुक्तीसाठी जावली तालुक्याचा नावलौकिक आहे. याच तालुक्यात ड्रग्जचा कारखाना थाटला गेल्याने सातारा पोलिसांची नाचक्की झाली आहे. सावरी ता. जावली येथे मुंबई क्राईम ब्रँचने धाड टाकत मेफेड्रॉन (एमडी) तसेच ते बनवण्यासाठी लागणारे रसायन व इतर पदार्थ जप्त केलेे. मुंबई पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार याची किंमत साधारण 115 कोटी रुपये आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या सातारा जिल्ह्यातील या कारवाईमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
यावर्षी जूनमध्ये सातारा शहर पोलिसांनी अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला असलेल्या चारभिंतीजवळ नशेची इंजेक्शन विक्री करणारी टोळी जेरबंद केली. पोलिस तपासात मुंबईवरुन ऑनलाईन नशेची इंजेक्शन साताऱ्यात येत होती. या टोळीमध्ये एक शिकाऊ डॉक्टर देखील होता. अशा बाजाराबुनग्यांचा बाजार शहर पोलिसांनी उठवून त्यांना अद्दल घडवली. अशा प्रकारे साताऱ्यात नशेडींचा व्हायटनर पासून सुरु झालेला चस्का पुढे गांजाची बांटा गोळी ते नशेली इंजेक्शनपर्यंत पोहोचला आहे.
एका रात्रीत मेफेड्रॉनचा कारखाना सुरु झालेला नाही. यामुळे हा कारखाना नेमका कधीपासून सुरु झाला आहे? आतापर्यंत किती ड्रग्जचे वितरण झाले? यामधील मुख्य संशयित आरोपी कोण? टोळीमध्ये किती जणांचा सहभाग आहे? ड्रग्ज तयार करण्यापासून ते विक्री पर्यंत यासाठी कोणाचा आशीर्वाद आहे? सातारा पोलिसांच्या निदर्शनास हे कसे आले नाही? सातारा पोलिस याची पाळेमुळे खणणार का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.