

सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच बांधकाम विभागात नोकरीच्या आमिषाने तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद वामन कांबळे (रा. सैदापूर, ता. सातारा) याच्या विरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकूण 1 लाख 27 हजार रुपये दिल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत म्हटले आहे.
मनीषा महेंद्र कांबळे (वय 45, रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फसवणुकीची घटना जुलै 2024 पासून वेळोवेळी घडली आहे. संशयित मिलिंद कांबळे याने तक्रारदार यांच्या पाल्याला सातारा जिल्हा परिषदेत क्लार्क लावतो, असे आमिष दाखवले. काम होण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी 1लाख, 27 हजार अशी रक्कम दिली. पैसे दिल्यानंतर नोकरी लागेल याची तक्रारदार वाट पाहत होते. मात्र जिल्हा परिषदेकडून तसेच संशयिताकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशयिताने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तक्रारदार यांनी याबाबत पान 2 वर
अधिक माहिती घेतली असता संशयिताने त्यांच्याप्रमाणेच आणखी काही जणांची फसवणूक केल्याचे समोर आले. गणेश अडागळे (रा.सातारा) यांच्याकडूनही संशयिताने 30 हजार रुपये घेतले. त्यांना बांधकाम विभाग सातारा येथे नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. तिसरे तक्रारदार सतिश शिरीष कुमार (रा. सातारा) हे असून त्यांच्याकडून 40 हजार रुपये संशयिताने घेतले. त्यांना पंचायत समिती सातारा येथे क्लार्क पदाचे आमिष दाखवले आहे. अखेर तिघांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून फसवणुकीची माीहती दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.