

सांगली : ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन कवठेपिरान (ता. तासगाव) येथील शेतकऱ्याकडून 6 लाख 32 हजार 500 रुपये उकळणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनिकेत श्रीबाळ वडगावे (वय 32, रा. जुना सरकारी दवाखान्यामागे, कवठेपिरान, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी रवींद्र गिरधर भिल (वय 35), साजन संजय भिल (27), अनिल रमेश भिल (30), नीलेश संजय भिल (25), लक्ष्मण सुकलाल भिल (41), अर्जुन रामकृष्ण भिल (22), दिनेश नाना भिल (25), अनिल सुरेश भिल (30), नितीन संजय भिल (32), दीपक ज्ञानेश्वर भिल (30 सर्व रा. दहीवद, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी अनिकेत वडगावे यांची कवठेपिरान येथे शेती आहे. सन 2025-26 या हंगामासाठी त्यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याशी ऊस तोडणी आणि वाहतूक करार केला होता. तसेच सर्व संशयितांसमवेत दि. 25 जून 2025 रोजी अमळनेर येथील ॲड. जयेश रमाकांत पाटील (रा. कलागुरूनगर, अमळनेर) यांच्या कार्यालयात ऊस तोडणी करारनामा केला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे प्रत्येक कोयत्याला (एक जोडी) 55 हजार याप्रमाणे त्यांना वेळेावेळी रोख रक्कम, तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून 6 लाख 32 हजार 500 रुपये दिले. परंतु संशयितांनी ऊस तोडणी मजूर पाठविले नाहीत. तसेच फिर्यादी अनिकेत वडगावे यांच्याकडून घेतलेली रक्कम देखील त्यांना परत दिली नाही. त्यामुळे अनिकेत यांनी फसवणुकीची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली.