

मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरात वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी मिरा-भाईंदर गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. भाईंदर पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये बसून सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात अटक केली असून, त्यांच्या बँक खात्यात तब्बल 87 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे.
भाईंदर पूर्वेकडील सिल्व्हर सूट हॉटेलमधील एका रूममध्ये काही व्यक्ती संशयास्पदरीत्या वास्तव्यास असून त्या ठिकाणाहून ऑनलाईन फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या पथकाने 2 जानेवारीपासून या हॉटेलवर पाळत ठेवली आणि अखेर सापळा रचून धाड टाकली.
या छाप्यात पोलिसांनी अंकित चौधरी (वय 29 ), रा. कोलकाता, जयेश कामठे (29) रा. पुणे, गोपीनाथ दळवी (31) रा. खेड, पुणे या तिघांना आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी त्यांचे इतर साथीदार रोनक, दीप, गोविंद आत्राम व अन्य एजंट यांच्यासोबत मिळून लोकांची ऑनलाईन फसवणूक करत होते. फसवणुकीतून मिळालेले पैसे आरोपी जयेश कामठे याच्या बँक खात्यात जमा केले जात होते आणि तिथून ते तात्काळ इतर खात्यांमध्ये वळवून सरकारचा महसूल बुडवला जात होता.
आरोपींना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी घटनास्थळावरून लाखो रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. आरोपींच्या प्राथमिक बँक खात्यांची तपासणी केली असता, त्यात 87 लाखांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. नवघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपींना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप हे करत आहेत.