

सातारा : सातारच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात 57 टक्के इतका पाणीसाठा झाल्याने रविवारी दुपारी धरणाचे चारीही दरवाजे 10 सेंटिमीटरने उचलून प्रतिसेकंद 1000 क्युसेक्स पाणी सांडव्यावरून वेण्णा नदी पात्रात, तर विद्युतगृहातून 500 क्यूसेक्स असे एकूण 1500 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. नदीपत्रात पाणी सोडण्याच्या नियोजनानंतर नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाच्या पश्चिमेकडे असलेल्या महाबळेश्वर भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून धुवाधार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. दररोज धरणपत्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण, सांडवमाथा पातळीस लागलेले पाणी व पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच आवश्यकतेनुसार जादा वा कमी पाणी सोडण्यात येणार आहे. पोलीस व महसूल विभागास सावधानतेबाबत पूर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. रविवारी दुपारी 3.30 वाजता इशाराचा भोंगा वाजून सर्वांना सावध करण्यात आल्यानंतर वेण्णा नदीत पाणी सोडण्यात आले. सध्या धरणातून नदीत 1500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यावर्षी मानसूने वेळेत व दमदार आगमन केल्याने धरणात लवकर पाणीसाठा झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.