सातारा : सांगलीहून पुण्याला नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. 1 रोजी पहाटे साडेचार वाजता झाला.
विठ्ठल गोविंद तारळेकर (वय 76, रा. झुलेलाल चौक, सांगली) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर पूजा नितीन तारळेकर (30), मुलगा देवांश नितीन तारळेकर (वय अडीच), नितीन विठ्ठल तारळेकर (36, सर्व रा. झुलेलाल चौक, सांगली), राजेश्वरी महेंद्र लोकरे (16), वीरधवल महेंद्र लोकरे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व सांगलीवरून कारने पुण्यातील नातेवाइकाच्या अंत्यविधीला निघाले होते. यावेळी नितीन तारळेकर हे कार चालवत होते. त्यांची कार शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत आली असता महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये विठ्ठल तारळेकर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर इतर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.