

वातावरणातील बदल आणि सततच्या गारव्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. रविवारी सातारा शहराचे किमान तापमान 13.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे थंड ठिकाण असलेल्या महाबळेश्वरच्या 14.3 अंशांपेक्षा कमी होते. त्यामुळे ‘महाबळेश्वरपेक्षा सातारा जास्त थंड!’ अशी स्थिती निर्माण झाली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामानात मोठा चढउतार सुरू आहे. कधी ढगाळ वातावरण, कधी कडक उन तर कधी वातावरणातील गारवा यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात तापमानात अचानक घट झाल्याने सकाळपासूनच हवा बोचरी झालेली होती.
रात्री आणि पहाटे बाहेर काम करणाऱ्या कामगारांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवाव्या लागल्या. शहरातील अनेक भागांत शेकोट्यांभोवती गप्पांचे फड रंगत होते. दिवसभरही वातावरणात गारठा कायम असल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला.
तापमानातील झपाट्याने झालेल्या घटीमुळे आरोग्य समस्याही वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारी व्यक्तींना थंडीचा त्रास जाणवत आहे. सर्दी, खोकला, कफविकार आणि त्वचेच्या तक्रारी वाढल्या आहेत. थंडी सहसा फायदेशीर मानली जात असली तरी अचानक आलेल्या गारठ्यामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे.
वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींना सांधेदुखी आणि वातविकारांचा त्रास अधिक जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
थंडी रब्बी हंगामातील काही पिकांसाठी लाभदायक असली तरी भाजीपाला पिकांसाठी मात्र अचानक तापमान घटणे धोकादायक ठरत आहे. टोमॅटो, वांगी, भोपळा, मिरची यांसारख्या पिकांच्या वाढीवर गारठ्याचा प्रतिकूल परिणाम होत असून उत्पादनाला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
महाबळेश्वर हे नेहमीच थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, मात्र यावेळी साताऱ्यातले तापमान त्यापेक्षाही खाली नोंदवले गेले. त्यामुळे नागरिकांनीही साताऱ्यातील हवामानाला ‘मिनी काश्मीर’ असे संबोधत थंडीचा अनुभव घेतला.