

सातारा : छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराजांच्या शौर्याला साजेसे गौरवशाली स्मारक व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे प्रेरणादायी स्मारक सातारा शहरात झाले पाहिजे, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या विश्वस्त, शिवाजी विद्यापीठ विदेश भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर 27 वा पुरस्कार श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे संघटक व माजी अध्यक्ष दिनकर झिंब्रे , सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त डॉ. जयपाल सावंत उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांचा विचार वाघिणीचे दूध आहे ते पचवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान नीट समजून घेण्याची गरज आहे. भारतीय नागरिकांना मत देण्याचे स्वातंत्र्य मिळाले पण आर्थिक व सामाजिक समता अजूनही प्रस्थापित झालेली नाही. जातीव्यवस्थेचा खात्मा करण्यासाठी जातीअंताची लढाई तीव्र करण्याची गरज आहे. बुद्ध, फुले, बाबासाहेब यांचे विचार मान्य नसणाऱ्यांकडून त्यांच्या पूजेचे ढोंग केले जात आहे. विषमतावादी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. या देशात मनूचे पुतळे उभे केले जातात. मनुस्मृती जाळायची नाही अशा प्रकारची घोषणा करणारे लोक आता पुढे येऊ लागले आहेत. ही अस्वस्थ करणारी बाब आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला पण आपण बुद्ध, बाबासाहेब, फुले नीट शिकलो नाही. भारतीय राज्यघटना व बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म नीट समजून घेण्याची गरज आहे.
डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, मातोश्री भिमाई पुरस्कार हा स्त्री चळवळीत संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान आहे. मी माझा हा पुरस्कार अशा स्त्रियांना अर्पण करते. पुरस्काराची दहा हजार रुपयाची रक्कम समाजात शांती व सलोखा निर्माण करण्यासाठी स्थापन केलेल्या स्त्री-संघर्ष मंचच्या संस्थेस देण्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल बनसोडे व भास्कर फाळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रमेश इंजे यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमास विश्वस्त प्राचार्य संजय कांबळे, संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.