

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्काराची घोषणा झाली असून दैनिक ‘पुढारी’चे सातारा विभागीय व्यवस्थापक व ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांची यासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार मराठी पत्रकारितेतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी ही घोषणा केली. राज्यभरातील एकूण 10 पत्रकारांचा या पुरस्कारासाठी गौरव होत आहे. त्यामध्ये पुण्याचे राजीव साबडे, नांदेडचे शंतनु डोईफोडे, मसूरचे बसवेश्वर चेणगे, श्रीरामपूरचे प्रकाश कुलथे, माणगावचे विजय पालकर, अहिल्यानगरचे श्रीराम जोशी, यवतमाळचे डॉ. अनिल काळबांडे आणि कोल्हापूरचे आशिष कदम यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार 6 जानेवारी 2026 रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनाच्या औचित्याने पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, बाळशास्त्री जांभेकर यांचा चरित्र ग्रंथ आणि विशेष सन्मानचिन्ह असा समावेश आहे.
जीवनधर चव्हाण हे 1993 पासून दैनिक ‘पुढारी’मध्ये कार्यरत असून तीन दशकांहून अधिक काळ सातत्यपूर्ण आणि प्रभावी पत्रकारिता केली आहे. कृष्णा खोरे महामंडळाच्या स्थापनेनंतर धरणग्रस्तांचे प्रश्न, तमाशा कलावंतांची अडचण, मांढरदेव दुर्घटना, प्रतापगड आंदोलन, खरोशी दुर्घटना, संगम माहुली येथील जिलेटीन स्फोट, दुष्काळ आणि सामाजिक–राजकीय विश्लेषण अशा अनेक विषयांवर त्यांनी सखोल आणि जबाबदार वृत्तांकन केले आहे. त्यांचे ‘खबरबात’ हे सामाजिक विकृतींना उजेडात आणणारे लोकप्रिय सदर विशेष चर्चेत राहिले. या सर्व योगदानाची दखल घेत दर्पण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी प्रथमच माहिती व जनसंपर्क विभागातील उत्कृष्ट लेखन करणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र निवड करण्यात आली आहे. या श्रेणीतील पहिला ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर आणि कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी सर्व मानकरी पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.
‘पुढारी’ समूहावर गेल्या अनेक वर्षांपासून ‘दर्पण’ पुरस्काराचे वर्चस्व कायम आहे. जीवनधर चव्हाण यांच्यापूर्वी मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, स्व. विलास माने, हरीश पाटणे, अशोक घोरपडे आणि स्व. मोहन कुलकर्णी यांना हा पुरस्कार मिळाला असून चव्हाण यांच्या रूपाने ‘पुढारी’ परिवाराने ‘षटकार’ पूर्ण केला आहे.