

वेणेगाव : अध्यात्मिक वारसा लाभलेले सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र अंगापूर वंदन या गावास महाराष्ट्र शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मंजूर केला आहे. त्यामुळे नववर्षाच्या प्रारंभी अंगापूर वंदनला राज्य शासनाने अनोखी भेट देऊन गावाचा सन्मान केला. या निर्णयामुळे या गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असून पर्यटनवाढीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे व सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख तथा अंगापूर वंदनचे सुपूत्र शरद कणसे यांच्या पाठपुराव्यामुळे अंगापूर वंदनला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असल्याची माहिती अंगापूर वंदन सोसायटीचे माजी चेअरमन सुभाष जाधव यांनी दिली.या गावांमध्ये प्राचीन मंदिरे, पवित्र तीर्थक्षेत्रे, निसर्गरम्य परिसर तसेच सांस्कृतिक परंपरा आजही जतन झालेल्या आहेत. दरवर्षी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. मात्र आतापर्यंत पर्यटनस्थळाचा अधिकृत दर्जा नसल्याने आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव होता. आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाशयोजना, विश्रांतीगृहे, पार्किंग आदी सुविधांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. अंगापूर वंदन हे गाव शैक्षणिक, धार्मिक, कुस्ती व सांस्कृतिक ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे गाव आहे. संताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या समर्थ रामदास स्वामींचा पदस्पर्श तर संत गाडगे महाराज यांचे वास्तव्य या पवित्र स्थळात लाभले होते. शिक्षण भगीरथ कर्मवीर अण्णांचे या गावाशी वेगळे नाते आहे. पवित्र कृष्णामाईच्या काठी असलेले हेमांडपंथी शिवनाथ मंदिर व समोर असणारा सुंदर नदी घाट, कृष्णा नदीतील काळडोहात समर्थ रामदास स्वामी यांना प्रभू श्रीराम व अंगलाई देवीच्या मूर्ती सापडल्या असून त्यांची प्रतिष्ठापना श्री क्षेत्र चाफळ व सज्जनगड येथे केली आहे.
गावास सातारा जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे हा दर्जा देण्यात आला आहे. याकामी सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, डॉ. विक्रम कणसे, पै. ऋषीराज कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, संदीप कणसे, तंटामुक्ती अध्यक्ष अजित कणसे, माजी चेअरमन सुभाष जाधव यांचे माहिती संकलनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.