

सातारा : सातारा शहर परिसरात अपघातांची मालिका सुरुच असून परिसरातील वाढते अपघात जीवघेणे ठरत आहेत. गेल्या तीन दिवसात याच परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट ते देगाव फाटा रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारावेळी मृत्यू झाला असून अतिक फारुख शेख (वय 51, सध्या रा. आनंदग्रीह सोसायटी, सारखळ फाटा ता.सातारा) असे त्यांचे नाव आहे. या परिसरातील अपघातात तीन दिवसातील हा दुसरा बळी गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातील रस्ते डेंजर झोन बनले आहेत. दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दि. 3 डिसेंबर रोजी असाच एक जीवघेणा अपघात झाला. अतिक शेख हे दुचाकीवरुन जात असताना मिक्सर (बांधकामासाठी वापरले जाणारे वाहन) असलेल्या ट्रकची धडक बसली. या घटनेत शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना उपचारासाठी सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. पोलिस याचा तपास करत आहेत. शेख यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. अतिक शेख हे महामार्गालगात एका शोरुममध्ये कामाला होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दि. 2 डिसेंबर रोजी देगाव ते सातारा रोडवर ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने ओंकार गवळी (वय 20) या युवकाचाही मृत्यू झाला. या अपघातातील संशयित ट्रक चालक हा ट्रकसह पसार झाला आहे. शुक्रवारपर्यंत त्याचा पोलिसांना शोध लागला नव्हता. सातारा शहरालगत एकदिवसाआड झालेल्या या अपघातातील दोन्ही ट्रक भरधाव होते. महामार्गालगत वाहने वेगात जात नसल्याने दुचाकीस्वारांच्या जिवावर बेतू लागले आहे. यामुळे वाहतूक विभागाने बेदरकार वाहनांवर कारवाई अशी मागणी होत आहे.