

पुसेसावळी : सातारा-सांगली मार्गावरील पुसेसावळी ते पारगाव फाटा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. जुलै महिन्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर लगेच काम सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अतिक्रमण, प्रशासन ठेकेदारातील मतभेद व समन्वयाच्या अभावामुळे कामाला विलंब झाला. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका वाहतूक आणि दैनंदिन प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. आता या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 7 ऑगस्ट रोजी रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात नोटीस काढली होती. सात दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु जवळपास तीन महिने उलटून गेले तरी कार्यवाही शून्य होती. दरम्यान ठेकेदार आणि प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने होत होता.
या संपूर्ण विषयावर ‘पुढारी’ने सातत्याने प्रकाश टाकला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल तातडीने दखल घेऊन काम मार्गस्थ केले आहे. विक्रमशील कदम यांनी अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारामुळे अखेर प्रशासन जागे झाले असून रखडलेले काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. काम थांबले नसते तर आज इतकी यातायात झाली नसती, पण आता तरी कामाला गती मिळत आहे, ही सकारात्मक बाब आहे. अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.