सातारा : मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी राजधानी सातार्यात शनिवार, दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता येणार आहेत. शिवतीर्थ पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली राजपथमार्गे राजवाड्यावर जाणार आहे. ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केली असून रॅली मार्ग भगवामय करण्यात आला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी गांधी मैदानावर सभा झाली होती. त्यानंतर मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या दुसर्या टप्प्य्यासाठी ते सातार्यात येत आहेत. राजधानीतील मराठा मुक मोर्चा ऐतिहासिक केला तशी ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने कंबर कसली आहे.
शनिवारी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे-पाटील सातार्यात येणार आहेत. त्यांचे कराड, उंब्रज, अतीत, काशीळ, नागठाणे, बॉम्बे रेस्टॉरंट चौक याठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. शिवतीर्थ येथे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दुपारी 12 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली झांजपथक, ढोल ताशा, तुतारी, हलगीच्या वाद्याच्या गजरात छ. शाहू महाराज चौक, कमानी हौद, मोती चौक मार्गे राजवाडा येथे पोहोचणार आहे. तेथे पोहोचल्यानंतर गांधी मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची तोफ धडाडणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे हे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेवून छ. शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक वाघनखे पाहणार आहेत.
रॅलीत ज्या महिला समन्वयक आहेत त्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. तर दीडशेहून अधिक मराठा सेवक असणार आहेत. त्यामुळे रॅलीत कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस किंवा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे. मोर्चाप्रमाणे ही रॅलीही शांततेत काढली जाणार आहे. रॅली मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून भगवे झेंडे लावण्यात येणार असल्याने रॅली मार्ग भगवामय झाला आहे.
मनोज जरांगे यांचे वादळ राजधानी सातार्यात धडकणार असल्याने या रॅलीसाठी येणार्या वाहनावर स्टिकर व झेंडे असतील तर अशी वाहने तासवडे व आनेवाडी टोलनाक्यावरून मोफत सोडली जाणार आहेत. दरम्यान, सकल मराठा समाजातील दहा मावळ्यांनी देहदानाचा संकल्प केला असून त्याबाबतची कार्यवाही आज शनिवारी पूर्ण केली जाणार आहे. क्रांतिकारकांच्या या जिल्ह्यात हे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले.