वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचा विकास पाहता आरक्षणाची गरज नाही, असे खळबळजनक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात सोमवारी केले होते. यावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.६) उत्तर दिले आहे. मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, हा एक सरकारचा डाव असून षड्यंत्राचा भाग आहे. आपापला पक्ष वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांना धडपड करावी लागत आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते. (Manoj Jarange on Raj Thackeray)
ओबीसींनी आपल्या घरात मनोज जरांगे यांचा फोटो लावून हार घालावा. मतदान करताना आपण ओबीसींनाच मतदान करावे, याची आठवण त्यामुळे होईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर त्यांचा सल्ला चांगला आहे. मी त्यांना उत्तर देणार नाही. त्यांचा आम्ही आदर करतो, असे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange on Raj Thackeray)
मराठवाड्यातील भाजप आमदारांची सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या विषयी ते म्हणाले की, आम्हाला राजकारणात ढकलू नका. जरांगे राजकारणात आला तर तुमचे फार हाल होतील. आम्हाला आरक्षण देऊन टाका, नाहीतर सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही. त्यानंतर आमच्याकडे बोटे करू नका, असे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange on Raj Thackeray)
१४ ते २० ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा डाटा घेणार आहे. त्यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर २९ ऑगस्टला निर्णय घेणार आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य लोक आमदार झालेले दिसून येईल. पुन्हा सत्तेत येण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे मिशन चालू आहे. परंतु हे मिशन देवेंद्र फडणवीस यांना वाचविण्यासाठी सुरू आहे, सत्तेत येण्यासाठी आहे, अशी टीका जरांगे यांनी केली.