पक्ष, नेता सोडा; जात, आरक्षणाच्या मागे राहा : मनोज जरांगे

; लोकसभेला हिसका दाखविला, विधानसभेबाबतही निर्णय घेऊ
Maratha Reservation  Manoj Jarange Patil
मनोज जरांगे
Published on
Updated on

सांगली : आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहेत. शिक्षणही नाही आणि नोकर्‍याही नाहीत. आत्महत्या सुरू आहेत. मराठा समाजाने आता तरी भानावर यावे. आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांमधील मराठ्यांनी आता पक्ष आणि नेता सोडून जातीच्या, आरक्षणाच्या मागे राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगलीत गुरुवारी जाहीर सभेत केले. आरक्षणाची लढाई संपू दे, अलमट्टीला धडक मारू. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त शेतकर्‍यांना भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. लोकसभेला हिसका दाखवला, आता विधानसभेबाबतही निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

Maratha Reservation  Manoj Jarange Patil
Maratha Reservation | मनोज जरांगे-पाटील आज पुणे कोर्टात राहणार उपस्थित

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सांगली दौर्‍यावर होते. विश्रामबाग चौकातून राममंदिर चौकापर्यंत जनजागरण शांतता रॅली निघाली. राममंदिर चौकात रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. जरांगे यांच्या भाषणासला सुरुवात होताच मराठा बांधवांनी प्रचंड जल्लोष केला. ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणेने परिसर दणाणून सोडला.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सलग अकरा महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठा समाजानेही आता मागे हटायचे नाही. मराठा समाजातील कष्टकरी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांनी मोठ्या कष्टाने मुलांना शिकवले, पण नोकर्‍यांअभावी ते बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. पक्ष, नेता, आमदार, मंत्री यांच्यावरील निष्ठा आता थांबवा. मराठा समाजाच्या हिताकडे पाहा. तुमचा एक आमदार मोठा होईल. पाच-सहाजण जिल्हा परिषद सदस्य, दहा-बाराजण पंचायत समितीचे सदस्य होतील, पण त्या पंधरा-वीस जणांसाठी तालुक्यातील लाखो मराठ्यांचे वाटोळे करायचे आहे का?

एकटा छगन भुजबळ विधानसभेत मराठा आरक्षणाला विरोध करतो. विधानसभेतील मराठा समाजाचे शंभर-दीडशे आमदार मराठा आरक्षणासाठी आवाज उठवत नाहीत. त्यामुळे विधानसभेत आपले हक्काचे आमदार पाहिजेत. त्यामुळे मराठ्यांनी पक्ष, नेता बाजूला ठेवून जातीसाठी, आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.

मराठे, धनगरांना फसविले

जरांगे म्हणाले, रस्त्यावरच्या लढाईस मी खंबीर आहे. विधानसभेत मराठ्यांचे पाच-पन्नास आमदार जाऊ देत. मराठ्यांना गोडीने आरक्षण दिले तर ठीक, नाही तर छाताडावर बसून आरक्षण घेऊ. मराठ्यांची रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे. सरकारने मराठे आणि धनगरांनाही फसवले आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर बांधवांना एसटी आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र ते केवळ आश्वासनच ठरले आहे.

दलित, धनगर, मुस्लिम, बारा बलुतेदार मराठ्यांसोबत

जरांगे म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय झाल्यास मराठा आरक्षण आंदोलनतर्फे दिल्या जाणार्‍या उमेदवाराला मराठा बांधवांनी डोळे झाकून मतदान करावे. समाजाचे मतदान शंभर टक्के झाले पाहिजे. मतदानावेळी तीर्थयात्रेला जाऊ नका. मतदार यादीतून बोगस मतदार बाहेर काढा. राज्यातील सर्व जाती-धर्माचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मराठ्यांची आहे. दलित, धनगर, मुस्लिम, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार सर्वांना तसा विश्वास वाटत आहे.

रॅलीत न येणार्‍यांना लक्षात ठेवा

जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण रॅलीत न येणार्‍यांना लक्षात ठेवा. त्यांना निवडणुकीत पाडा. रॅलीत जाऊ नका, असे फोन करून सांगणार्‍या आमदार, मंत्र्यांना निवडणुकीत पाडायचे काम करा.

अलमट्टीची उंची मोजू

जरांगे म्हणाले, पुराने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेती आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये. आरक्षणाचे आंदोलन संपू दे, अलमट्टीला धडक मारू. अलमट्टी धरणाची उंची मोजू. धरणाच्या भिंतीची उंची कमी करायला भाग पाडू.

Maratha Reservation  Manoj Jarange Patil
Manoj Jarange | मराठ्यांच्या मुलांना संपविण्याचा सरकारचा घाट : मनोज जरांगे

फडणवीसांचे आणखी एक षड्यंत्र

मनोज जरांगे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यामागे एसआयटी लावली आहे. ते आता आणखी एक षड्यंत्र रचत आहेत. गेवराई तालुक्यातून मला एक नोटीस पाठवण्याचे काम सुरू केले आहे. माझ्यावर कसलीही केस करा, मी त्याला अजिबात जुमानत नाही.

वेगवेगळ्या टोळ्या; भुजबळ मुकादम

मनोज जरांगे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी आणि माझ्या बदनामीसाठी वेगवेगळ्या टोळ्या जमवल्या आहेत. छगन भुजबळ यांना एका टोळीचे मुकादम केले आहे. प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातूनही मराठा नेते, मराठा संघटना फोेडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भुरटे, छोटे-मोठे डाके मारणारे, गटार व शौचालयातही पैसे खाणर्‍यांना माझ्याविरोधात बोलायला लावले जात आहे. माझ्या गुडघ्याएवढाही नसलेला मुंबईतील एक दीडफुटी आमदार बेताल वक्तव्य करत आहे. त्यांना कोणाचे पाठबळ आहे, हे लपून राहिलेले नाही.

शाह - शाह्या मराठे पाहत नाही

मनोज जरांगे म्हणाले, मराठे एकदा मागे लागले की शाह, शाह्या पाहत नाही. अटक - कटक हलवून सोडतो. मागच्या दाराने केलेल्या आमदारांना आवरावे. लोकसभेला कचका दाखवला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयर्‍यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत 13 ऑगस्टपूर्वी निर्णय घ्या. अन्यथा 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठ्यांची देशातील सर्वात मोठी बैठक घेऊ. विधानसभा निवडणूक लढवायची, की मराठ्यांविरोधातील पक्षांचे 288 आमदार पाडायचे, याचा निर्णय घेऊ.

पुन्हा मुंबईला जायचं का?

जरांगे म्हणाले, गेल्यावेळी मराठे मुंबईच्या दिशेने निघाले होेते. आंदोलक वाशी येथे पोहोचले असतानाच सरकारची फजिती झाली. मराठ्यांचा सागर मुंबईत धडकला असता, तर त्यांचे काही खरे नव्हते. पुन्हा मुंबईला जायचं का? मराठे मुंबईत गेले, तर त्यांना मुंबईबाहेर यावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news