

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत त्यामुळे कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी या धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अधून मधून पावसाच्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. डोंगररांगामध्ये दाट धुके पसरले होते.
कोयना धरणात 98 .400 टीएमसी पाणीसाठा असून धरण 98.28 टक्के भरले आहे. धरणातून 11 हजार 200 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धोम धरणात 11.630 टीएमसी पाणीसाठा असून धरण 99.49 टक्के भरले आहे. धरणातून 1 हजार 627 क्युसेक विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धोम बलकवडी धरणात 3.950 टीएमसी पाणीसाठा असून धरण 99.75टक्के भरले आहे.
धरणातून 1 हजार 142 क्युसेक विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणात 9.547 टीएमसी पाणीसाठा असून धरण 99.50 टक्के भरले आहे. धरणातून 740 क्युसेक विसर्ग वेण्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात 9.620 टीएमसी पाणीसाठा असून धरण 99.69टक्के भरले आहे. धरणातून 450 क्युसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. तारळी धरणात 5.840 टीएमसी पाणीसाठा असून धरण 99.93 टक्के भरले आहे. धरणातून 290 क्युसेक विसर्ग तारळी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. वीर धरणातून 2 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
मध्यम प्रकल्प असलेले येरळवाडी, नेर,राणंद, आंधळी, नागेवाडी ही धरणे 100 टक्केभरली आहेत. मोरणा 93.77 टक्के, उत्तरमांड 67.86 टक्के, महू 79.83 टक्के, हातगेघर 46.30 टक्के, वांग मराठवाडी 72.65 टक्के भरले आहे. जिल्ह्यात सातारा 2.5 मि.मी., जावली 0.4 मि.मी., पाटण 2.7 मि.मी, कराड 0.8 मि.मी. कोरेगाव 0.6 मि.मी., खटाव 0.2 मि.मी., खंडाळा 0.2 मि.मी., वाई 1.7 मि.मी., महाबळेश्वरला 2.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.