

सातारा : सातारा जिल्हा परिषदेकडील अभियंता संवर्गातील कर्मचार्यांच्या सेवाविषयक मागण्या बर्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचार्यांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून अभियंता संवर्गातील कर्मचार्यांना न्याय देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेकडील सन 2022 पासून कार्यरत असलेले स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांचा परीविक्षाधिन कालावधी अद्याप समाप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांना सेवाविषयक बाबींच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांच्या नियुक्ती आदेशामध्ये एक वर्षाचा परिविक्षाधिन कालावधी होता. हा कालावधी त्यांनी समाधानकारकरित्या पूर्ण केला असून त्यांचा परीविक्षाधीन कालावधी समाप्त करण्यात यावा, सुधारीत आश्वासीत प्रगती योजना व दहा, वीस, तीसचे लाभ गेले 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे अभियंत्यांची कुचंबणा होत आहे. त्यासाठी हे लाभ वेळेत मिळावेत. कनिष्ठ अभियंता यांना शाखा अभियंता दर्जा देण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे बर्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. तरी पात्र कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता दर्जा वेळीच व पात्र दिनांकापासून मिळावा.
कार्यरत असणारे शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची प्रवासभत्ते देयके गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने वेळच्या वेळी प्रवासभत्ते त्वरित देण्यात यावेत. प्रवासभत्ता वेतनाबरोबर अदा करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात यावी यासह विविध मागण्यांबाबत जिल्हा परिषदेकडील अभियंता संवर्गातील कर्मचार्यांकडे जिल्हा प्रशासनामार्फत दुर्लक्ष होत आहे.
पदोन्नतीमध्ये अन्याय...
जे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ज्या स्थापत्य अभियांत्रिक सहायक यांची वयाची 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना शासकीय नियमानुसार व्यावसायिक परीक्षेमधून सूट देऊन कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती देण्यात यावी. आपल्या जिल्हा परिषदेकडून काही कनिष्ठ अभियंत्यांना अनुशेष रिक्त असतानादेखील वेळेत पदोन्नती न दिल्याने तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आलेली असल्याने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तरी सदर कनिष्ठ अभियंत्यांना त्यांची सेवा ज्या दिनांकास विहीत मुदतीत पूर्ण होत आहे. त्या दिनांकास पूर्वलक्षी प्रभावाने त्या पदाचा मानिव दिनांक मिळावा.