

शिरवळ : लोणंद-शिरवळ मार्गावरील वीर धरणावर फिरण्यासाठी आलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत विनोद सुरेश गेंदे (वय 34, रा. कोथरूड, ता. हवेली, जि. पुणे) या युवकाचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड येथे एकाच इमारतीत राहणारे रायभान पाटेकर, विनोद गेंदे आणि अर्जुन सणस हे तीन मित्र बुधवारी वीर धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दुपारी जेवणाची ऑर्डर देऊन पाण्याजवळ फोटो काढल्यानंतर विनोद गेंदे पाण्यात उतरला. पोहत असताना तो खोल पाण्यात गेला आणि अचानक बुडू लागला. विनोद पाण्यात बुडताना दिसताच त्याच्या दोन्ही मित्रांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तत्काळ शेजारील हॉटेलमध्ये धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.
घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू तसेच शिरवळ रेस्क्यू टीम यांना पाचारण करण्यात आले. गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी सातच्या सुमारास विनोद गेंदे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी रायभान पाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.