Satara politics : जयकुमार - शंभूराज यांच्यात जुंपली

पालकमंत्री म्हणतात, ‌‘दहशत चालू देणार न्हाय‌’
Satara politics : जयकुमार - शंभूराज यांच्यात जुंपली
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‌‘दहशत‌’ आणि ‌‘नाद‌’ या दोन शब्दांवरून भाजपचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे पर्यटनमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना थेट इशारा दिला आहे. ना. गोरे यांनी ‌‘माझा नाद करायचा न्हाय‌’ अशी सज्जड तंबी दिली, तर ना. देसाई यांनी दहशत चालू देणार नसल्याचा इशारा दिला. या जुगलबंदीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Satara politics : जयकुमार - शंभूराज यांच्यात जुंपली
Solapur Politics : आमदारद्वय देशमुखांचे स्वपक्षालाच आव्हान

नगरपालिका निवडणुकीनंतर आता झेडपी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांमधील सुंदोपसुंदी या ना त्या कारणावरून समोर येऊ लागली आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटात अलबेल नसल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसून आले होते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा गुरुवारी फलटणमध्ये आला. ना. जयकुमार गोरे व ना. शंभूराज देसाई यांच्यातील वाक्‌‍युद्धाचा भडका उडाला.

फलटण नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी फलटणमधील दहशतीचा उल्लेख केला होता. स्वत:च्या चेहऱ्यावरून हात फिरवत ‌‘दाढीपुढे दहशत चालत नाही‌’, असे दर्शवले होते. फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत, ‌‘कोणतरी फलटणमध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणाले. त्यांना मला सांगायचे आहे, दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे. (दाढीवरून हात फिरवत) आमच्या नादाला लागायचे नाही, असा इशाराच त्यांनी दिला. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला, त्यांना मी सोडत नाही. तुम्ही बघितलं असेल कोरेगावमध्ये आमच्या वाटेला जाणाऱ्याचं काय झालं? उत्तर कराडमध्ये आणि आता फलटणमध्ये काय अवस्था झाली आहे? आमच्या वाटेला गेलात तर त्यांचं काय होतं हे तुम्ही पाहिले, अशी नाव न घेता मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली.

दरम्यान, या टीकेला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील उत्तर दिले. ते म्हणाले, ‌‘माझा नाद करायचा नाही‌’, असं जयकुमार गोरे म्हणताहेत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे, हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही. निवडणुका असो-नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे. नाद नाही करायचा, असे मंत्री गोरे म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की, दहशत त्यांची आहे. हा जिल्हा दहशत कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली, तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल, अशा शब्दात ना. शंभूराज देसाई यांनी ना. गोरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. एकूणच या ‌‘अरे‌’ला ‌‘कारे‌’च्या उत्तराने महायुतीतील दोन मोठ्या नेत्यामंध्ये चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळाले.

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांवेळी महायुतीतील मंत्री शिवेंद्रराजे भोसले व शंभूराज देसाई, जयकुमार गोरे व मकरंद पाटील यांच्यात अनेकदा जुंपल्याचे चित्र दिसले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर असतानाच शंभूराज देसाई व जयकुमार गोरे यांच्यात कळवंड लागली आहे. त्याचे पर्यवसान पुढे आणखी कशात होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Satara politics : जयकुमार - शंभूराज यांच्यात जुंपली
Sangli Politics: भाजपच्या उमेदवारीचा तिढा कायम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news