

सोलापूर : आयारामांना उमेदवारी दिल्यास अन्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिका जाहीर करून सोलापुरातील आमदारद्वय देशमुखांनी सूचक पद्धतीने भाजपलाच आव्हान दिले. अर्थात, या आमदारद्वयांचा रोख पूर्णतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीस तसेच अन्य पक्षांतील लोकांना भाजपमध्ये घेण्यास विरोध करणारा आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नसून गेल्या तीन दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे हे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपचे आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबत आ. विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी आ. सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठक झाली.
दरम्यान, आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपातील निष्ठावंतांवर अन्याय होऊन देणार नाही. जे कार्यकर्ते भाजपचे पूर्वीपासून काम केले आहेत, ते अन्य पक्षातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवित असल्यास त्यांना मदत करू, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे संकेत मिळत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी रघुनाथ कुलकर्णी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागेवर अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. चोवीस तासाच्या आत आ. कल्याणशेट्टी यांनी राजीनामा दिला. प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील भाजपाचे तिन्ही आमदार आणि शहराध्यक्ष हे सक्षम असून, त्यांनीच भाजपाचे उमेदवार निवडतील, असे स्पष्ट केले खरे पण पुन्हा दोन दिवसांतच पालकमंत्री गोरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील किसान जाधव, नागेश गायकवाड यांना भाजपत प्रवेश दिले. पक्षाच्या उमेदवारी निवडी आणि युतीच्या वाटाघाटीबाबत आमदारद्वय देशमुखांना विश्वासात घेतला नाही. त्यामुळे आमदारद्वयांनी पालकमंत्री गोरे विरोधात मोर्चेबांधणी सुरु केल्याचे चित्र आहे.
उमेदवार निवडीत पालकमंत्री गोरे यांचा हस्तक्षेप होत आहे. पार्टीने उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी काम करु, असे सांगत निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे भूमिका घेतल्याने आता तिकीट वाटपाचे पुन्हा प्रश्न उभे राहिले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाला शिव्या दिल्या, अशांना पक्षात संधी देणे योग्य नसल्याची भूमिकाही आ. देशमुख यांनी मांडली आहे.
...तुम्हीच घ्या निर्णय
पालकमंत्र्यांसह झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत शहरातील भाजपचे तिन्ही आमदार उपस्थित होते. मात्र पालकमंत्री गोरे ज्या पद्धतीने कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत, त्याबद्दल आमदारद्वय देशमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, तुम्हीच घ्या निर्णय. आम्हाला काय कळंतय. अशा शब्दात आपला संताप व्यक्त केल्याचे समजते. यामुळे पालकमंत्री स्तब्धच झाले.