

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी निश्चिती रखडलेली आहे. सुमारे पंधरा ते वीस जागांबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. गुरुवारी सकाळी मुंबईत रायगड बंगल्यावरील बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत बैठक झाली. एकमत न झालेल्या जागांवर उमेदवारी निश्चितीचे अधिकार मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना देण्यात आले. दरम्यान, महायुतीतील शिवसेनेला किती जागा द्यायच्या आणि नेमक्या कोणत्या द्यायच्या यावरही भाजप-शिवसेना यांच्यात एकमत होऊ शकले नाही.
भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. एकूण 78 जागांसाठी 529 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिलेली आहे. महायुतीला घटकपक्षांच्या जागांबरोबरच भाजपमध्ये सांगली व मिरजेतील काही प्रभागांतील उमेदवारीवरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. गुणवत्तेवर उमेदवारी निश्चितीऐवजी आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी हवी, यासाठी नेतेमंडळींचा आग्रह कायम राहिलेला आहे. त्यामुळे एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवारांची संभाव्य यादी घेऊन नेतेमंडळी बुधवारी रात्री मुंबईला रवाना झाली होती.
गुरुवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रायगड बंगल्यावर प्राथमिक बैठक झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील, नीता केळकर उपस्थित होते.
सुमारे 15 ते 20 जागांचा अपवाद वगळता अन्य जागांवर उमेदवारी निश्चिती बऱ्यापैकी झाली आहे. 15 ते 20 जागांबाबत मात्र एकमत होऊ शकलेले नाही. यामध्ये सांगली व मिरजेतील जागांचा समावेश आहे. पक्षातील नवा-जुना वाद आणि गट-तट यातून उमेदवारी निश्चित होण्यात अडचण आली आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावरील प्राथमिक चर्चेनंतर रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, तसेच सांगलीहून गेलेले भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. एकमत झालेल्या व न झालेल्या जागा, उमेदवारीबाबत चर्चा झाली. वर्षा बंगल्यावर अन्य महापालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानेही अनेक शिष्टमंडळे आली होती. पुणे महापालिकेच्या जागा, उमेदवारीबाबत चर्चेमुळे सांगलीबाबतची चर्चा थांबवण्यात आली. काल, गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर सांगलीबाबत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. एकमत नसलेल्या जागा, तेथील राजकीय, सामाजिक स्थिती, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारीसंदर्भात दिलेली आश्वासने तसेच प्रभागनिहाय केलेले सर्वेक्षण यावरून मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चव्हाण उमेदवार निश्चित करतील, असे स्पष्ट संकेत मिळाले.
यादी रखडणार; उमेदवारांना जाणार फोन
भाजपमधील अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे त्यांची निराशा होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यताही मोठी आहे. भाजपमधील संभाव्य बंडखोर विरोधी महाविकास आघाडीच्या हाताला लागू नयेत, यासाठी भाजपची उमेदवारी यादी रखडणार असे दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. भाजपची उमेदवारी यादी दि. 30 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधित उमेदवारांना कामाला लागण्यासाठी नेत्यांकडून फोन जातील, अशी चर्चा आहे.
इच्छुक हवालदिल; काहींची उमेदवारी कटणार
भाजपची उमेदवारी यादी रखडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 2018 ते 23 च्या सभागृहातील काही नगरसेवकांची उमेदवारी कापली जाणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. उमेदवारी यादीत जुने-नवे चेहरे असणार आहेत. एकूणच उमेदवारीच्या अनिश्चितीमुळे अनेक इच्छुक हवालदिल झाले आहेत. भाजपमधील काही इच्छुकांना विरोधी गोटातून उमेदवारीची आमिषे दाखवली जात आहेत.