सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर कडक टीका करत पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर असणार आहेत.
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री आज फलटणमध्ये उपस्थित राहणार आहेत. फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे. ही सभा यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानात पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला काय संबोधित करतात किंवा काय आव्हान करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
निंबाळकरांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण
आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे नमूद केले होते. यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. याव्यतिरिक्त, घरमालक प्रशांत बनकर याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही तिने लिहिले होते.
या डॉक्टरने मृत्यूपूर्वी, पोलीस उपनिरीक्षक बदने आणि एका खासदाराच्या स्वीय सहाय्यकाकडून रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या आरोपींना 'फिटनेस सर्टिफिकेट' देण्यासाठी दबाव आणला जात असल्याची तक्रार देखील नोंदवली होती. या तक्रारीत खासदाराचा उल्लेख असल्याने, हा संबंध भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी जोडला जात आहे. त्यातच आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला निंबाळकर उपस्थित राहणार असल्याने ते आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.