

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरालगत महामार्गावरुन महाविद्यालयात जात असताना एका विकृत युवकाने युवतींचा पाठलाग करुन विचित्र हावभाव करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने त्या विकृताला पकडत चोप दिला. गुरूवारी ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशीरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा शहरालगत महाविद्यालय असून युवती बसस्टॉपवर उतरल्यानंतर चालत ब्रिजवरुन (पुलावरुन) महाविद्यालयात जातात. नेहमीप्रमाणे काही युवती जात असताना त्याठिकाणी एक युवक आला. संबंधित युवक युवतीचा पाठलाग करत तेथे आला होता. युवतीला विचित्र हावभाव करत इशारे करु लागला. या घटनेने युवती घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ही बाब इतर युवतींनी ओळखल्यानंतर गोंधळ उडाला. याच दरम्यान विकृत युवकाने विकृत चाळे केले. यामुळे युवती घाबरुन तेथून पळून जावू लागल्या.
संबंधीत युवक युवतीची छेड काढत असल्याचे पाहून त्याला काही युवकांनी पडकण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. युवकांनी त्याला घेरून चोप दिला. यामुळे परिसरात गर्दी वाढली. त्यानंतर युवकाने तेथून पलायन केले. सुमारे अर्धा तास परिसरात गोंधळ सुरु होता. महाविद्यालयात या घटनेची माहिती समजल्यानंतर शिक्षकांनी पीडित युवतीला व तिच्या मैत्रिणींना बोलावून घेत शांत केले. घडलेली घटना गंभीर असल्याने त्या युवतीला पोलिस ठाण्यात जावून तक्रार देण्यास सांगितले. युवती सायंकाळी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने तक्रार देण्यास सुरुवात केली.
सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसही हादरुन गेले. घटनेची व विकृत युवकाची नेमकी माहिती घेतली. संशयित युवक जखमी झाल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. पोलिसांनी त्याची माहिती घेतली. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरु होते.
सातारा शहरालगत अनेक महाविद्यालये आहेत. मुली बस, रिक्षाने कॉलेजसाठी जातात. ही बाब टवाळखोर युवकांना माहित आहे. याचाच गैरफायदा घेवून मुलींचा पाठलाग करणे, छेडछाड करणे असे प्रकार होत आहेत. गुरुवारी वर्दळ नसलेल्या ठिकाणीच महाविद्यालयीन युवतीच्या बाबतीत घटना घडली आहे. यामुळे युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.