मी ज्या मुलीसोबत लग्न करणार होतो, त्यामुलीसोबत तु का लग्न केले या कारणावरुन पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना केजमध्ये शनिवारी (दि.17) उघडकीस आली. या मारहाणीनंतर नराधमाने गर्भवतीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना ही समोर आली आहे.
शनिवारी पीडित नवरा-बायको राजेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करिता गेले होते. ते दोघे पती-पत्नी गर्भवतीची वैद्यकीय तपासणी करून गावाकडे येत असताना दुपारी १:०० सुमारास नांदूरघाट येथील पारा चौकात त्यांना आवाज देवून त्यांच्या नातेवाईकांनी अडविले. त्यापैकी एकजण म्हणाला की, मला ज्या मुलीसोबत लग्न करायचे होते तिच्या सोबत तू का लग्न केलेस? असे म्हणून त्या सर्वांनी पती-पत्नी या दोघांना शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. एकाने त्याच्या जवळच्या शिकारीसाठी वापरत असलेल्या पारंपरिक गलोलीने दगड मारून डोके फोडले. आणि पूर्वी त्या विवाहितेचे ज्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, त्याने त्या गरोदर विवाहितेचा विनयभंग केला.
दरम्यान तरुणाने या भांडणाची माहिती मोबाईलवरून त्याच्या वडिलांना दिल्या नंतर त्याचे वडील, भावजई आणि पुतणी आले. त्यांना पण काठीने मारहाण करून त्याच्या वडिलाचे काठीने डोके फोडले. त्या तरुणाच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात त्याचे नातेवाईक शिवाजी दादा शिंदे, लक्ष्मण दादा शिंदे, रामा लाला शिंदे, शंकर लाला शिंदे, सचिन विश्वास शिंदे, दादा सरदार शिंदे, लाला सरदार शिंदे आणि बबन सरदार शिंदे या आठ जणांच्या विरुद्ध विनयभंग आणि मारहाण करून दुखापत करणे यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उमेश आघाव हे तपास करीत आहेत.