सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलणारी मॉडेल स्कूल तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील महत्त्वाची प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळकटी देणारी स्मार्ट पीएचसी या संकल्पना यशस्वीपणे राबवणार्या प्रशासनाचे काम कौतुकास्पद आहे. सरकारी पातळीवर राबवण्यात येत असलेला उपक्रम पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व त्यांच्या सहकारी अधिकार्यांच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या. पर्यटनवाढीसाठी राबवण्यात येणार्या उपक्रमांमध्ये परदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देश राज्यपालांनी दिले.
जिल्ह्यात विकासकामे तसेच राज्य व केंद्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जिल्हा प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेतली. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख वैशाली कडुकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे, सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता अमर काशिद, सातारा तहसीलदार नागेश गायकवाड, मुख्याधिकारी अभिजीत बापट आदि प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे स्वागत केले. बैठकीत सुरूवातीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे राज्यपालांना माहिती दिली. जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन प्रकल्पांतर्गत विविध पर्यटन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुनावळे, पापर्डे-हेळवाक येथे जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात येणार असून मुनावळे येथे पर्यटनास सुरूवात झाली आहे. क्षेत्र महाबळेश्वर या तीर्थस्थळाचा विकास करण्यात येत आहे. प्रतापगड किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी मॉडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्मार्ट पीएचसी उपक्रम राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची मदत झाली. लोकप्रतिनिधींनीही जिल्हा नियोजनमधून 25 टक्के निधी शिक्षण व आरोग्य यावर खर्च करण्यास सकारात्मकता दाखवली.
इतर जिल्ह्यांमध्ये आरोग्य व शिक्षणावर 4 ते 5 टक्केच निधीची तरतूद केली जाते. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यात दोन्ही उपक्रम चांगल्यापद्धतीने राबवता आले. राज्य शासनाकडून पर्यटकांना सर्वाधिक निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांमुळे तसेच विकास प्रकल्पांमुळे मानव निर्देशांक वाढवण्यास मदत झाली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. सरकारी शाळांसाठी राबवण्यात येत असलेला उपक्रम अनोखा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार असल्याने प्रशासनाने राबवलेल्या या दोन्ही संकल्पना पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगत राज्यपालांनी जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीवर गौरवोद्गार काढले.सातार्यात जवळपास वर्षाला 15 लाख पर्यटक येतात. त्यापैकी किती पर्यटक परदेशी असतात? अशी विचारणा राज्यपालांनी केली. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या.
राज्यपालांनी माध्यमांच्या निमंत्रित शिष्टमंडळालाही संवादासाठी निमंत्रण दिले होते. यामध्ये पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै.‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरिष पाटणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष व सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राजेश सोळसकर, दिपक शिंदे, सुजीत आंबेकर हे या चर्चेसाठी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्याने सर्वाधिक प्रयत्न केले आहेत. दिल्लीपर्यंत आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपण केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करावा, अशी विनंती या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. सातारा जिल्हा पर्यटनाच्याद़ृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचला पाहिजे यासाठी नांदेडच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांसाठी व पर्यटनांसाठी भरीव निधी मिळायला हवा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पर्यटनस्थळांवरची अतिक्रमणे काढून या पर्यटनस्थळांनी मोकळा श्वास घ्यावा, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.
राज्यपालांनी या सकारात्मक सूचनांचे स्वागत केले. ऐतिहासिक पर्यटन आणि नैसर्गिक पर्यटन याचा एकत्रित मिलाफ करून जिल्हाधिकारी डुडी यांनी उत्तम प्रस्ताव केला आहे. मला त्याचे कौतुक वाटते, अशा शब्दात राज्यपालांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले. निवडणुका असल्याने अतिक्रमणांच्या विषयाला आत्ताच कोण हात घालणार नाही. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशी अतिक्रमणे नक्की निघतील, असेही राज्यपाल म्हणाले. त्यावर जिल्हाधिकारी डुडी यांनी महाबळेश्वरसारख्या ठिकाणी आम्ही यापूर्वीच अतिक्रमणे काढली असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचे राज्यपालांपुढे कौतुक केले. सातार्याची पत्रकारिता समृद्ध आहे, तिला दर्जा आहे. अभ्यासू संपादकांची फळी या जिल्ह्यात असल्याने सकारात्मक पत्रकारितेमुळे विकासाला चालना मिळत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी राज्यपालांना सांगितले. राज्यपालांनीही त्याचे कौतुक केले.