

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले असून जनजीवन चिंब भिजून गेले आहे. सोमवारी सकाळपासून पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने कण्हेर, धोम, उरमोडी, वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कोयना व कृष्णेला पूर आला आहे. त्यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी मंगळवारी रेड अलर्ट तर बुधवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मात्र दोन दिवसांपासून पहा जोर वाढला असून पश्चिम भागात मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार वार्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे.
धोम धरण 97.59 टक्के भरले असल्याने धरणातून 8 हजार क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धोम बलकवडी धरण 99.31 टक्के भरले आहे. त्यामुळे 3 हजार 811 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तारळी धरणाच्या सांडव्यातून 1 हजार 608 क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
कण्हेर धरणाच्या सांडव्यातून 3 हजार 300 क्युसेक व विद्युतगृहातून 700 क्युसेक असे मिळून 4 हजार क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणामधून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी काठच्या नागारिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उरमोडी धरणातून 2 हजार 160 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणांतर्गत पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटावरून तीन फूट तर रात्री आठ वाजता पाच फूट वर उचलले. मात्र पावसाचा जोर वाढल्याने रात्री 11 वाजता हे दरवाजे 7 फुट वर उचलले. त्यातून प्रतिसेकंद 44 हजार 800 व पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण 46 हजार 900 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, धरणांत पाण्याची आवक वाढेल त्या पटीत पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने जादा पाणी सोडणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
कोयना धरणात सध्या सरासरी 45,082 क्युसेक पाण्याची आवक होत असून सध्या 96.87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 8.38 टीएमसी इतक्याच पाण्याची गरज आहे. धरणाच्या सहा वक्री दरवाजातून पाच फुटांनी 33 हजार व पायथा वीजगृहातील वीस मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे चाळीस मेगॅवॅट वीजनिर्मिती करत 2,100 असे प्रतिसेकंद एकुण 35 हजार 100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात चोवीस तासांसह एक जूनपासून पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 208 (3501) मिलिमीटर, नवजा 137 (4176) मिलिमीटर, महाबळेश्वर 146 (4116) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.