

सातारा : सातारा पालिकेने नागरिकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत स्वत:चा ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ तयार केला आहे. या अत्याधुनिक डिजिटल सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना नगरपालिकेच्या विविध प्रकारच्या 9 सुविधा एका क्लिकवर मिळणार आहेत. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेचे उपक्रमशील मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सातारकरांसाठी ही अनोखी संकल्पना अस्तित्वात आणली आहे.
सातारा पालिकेने सातारकरांसाठी विविध सेवा ऑनलाईन केल्या आहेत. आता नव्याने आणलेल्या ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ सुविधेसाठी नागरिकांना 7030409090 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवावा लागणार आहे. त्यानंतर, आवश्यक सेवा पर्याय उपलब्ध होऊन त्वरित माहिती, अर्ज किंवा तक्रार नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या सेवेचा स्वतंत्र लोगो सातारा पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच ‘माय सातारा’ अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’च्या माध्यमातून सातारा शहरातील नागरिकांना 9 सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये नगरपालिकेच्या कर विषयक सेवा व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा, पाणी कर भरण्याची सुविधा, तक्रार दाखल करण्याची सुविधा-तक्रार नोंदवल्यानंतर नागरिकांना एक तक्रार आयडी मिळणार असून त्यामुळे तक्रारीचा निपटारा स्थिती तपासता येणार आहे. एकत्रित लोकसेवा सुविधा, वृक्षतोड परवानगी सुविधा, पाळीव प्राणी परवानगी सुविधा, संकेतस्थळ, मालमत्तेची संपूर्ण माहिती-नागरिकांचा मोबाईल क्रमांक नगरपालिकेच्या मालमत्ता क्रमांकाशी लिंक असेल तर त्या मालमत्तेची सर्व माहिती तत्काळ मिळणार आहे.
डिजिटल सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा...
डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वपर करुन नागरी सेवांचा दर्जा उंचावणे ही गरज आहे. सातारा नगरपालिकेचा ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ हा त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी या सुविधेचा स्वीकार करून तिचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाचे आहेत. यासाठी दि. 29 ऑगस्टपर्यंत लेखी स्वरूपात किंवा नगरपालिकेच्या ईमेलवर सुचना पाठवाव्यात. नागरिकांच्या सुचना व तांत्रिक सुधारणा लक्षात घेऊन सेवेत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.