

महाबळेश्वर: सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर शहरात सध्या पाण्याची मोठी टंचाई सुरू आहे. वेण्णालेक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (MJP) पंपिंग स्टेशनचा पॅनल बोर्ड जळाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या महत्त्वाच्या पॅनल बोर्डची दुरूस्ती होईपर्यंत, शहरासाठी विल्सन पॉईंट जलशुद्धीकरण केंद्रातून तात्पुरता पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाबळेश्वरच्या पाणीपुरवठ्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत व्यत्यय येत आहेत. नागरिकांना अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर कधीकधी चक्क तीन-तीन दिवस पाण्याविना हाल सहन करावे लागतात. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना मोठी वणवण करावी लागत आहे.
ऐन दिवाळीच्या पर्यटन हंगामाआधी ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. "पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण थांबणार तरी कधी?" असा संतप्त सवाल महाबळेश्वरकर विचारत आहेत.
शहरातील ही गंभीर समस्या लक्षात घेऊन महाबळेश्वर पालिका प्रशासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता व्यक्त होत आहे.