

प्रेषित गांधी
महाबळेश्वर : थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. स्थानिकांसह पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना मंगळवारी पहाटे शहरातील वेण्णा लेक आणि लिंग मळा परिसरात हिमकणांची चादर पसरल्याचे दिसून आले. येथील गवत आणि वाहनांच्या टपांवर, वेण्णा लेकच्या जेट्टीवर दवबिंदू गोठून हिमकण तयार झाल्याचे पर्यटकांना पाहायला मिळाले. हंगामात प्रथमच हिमकण दिसल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांत महाबळेश्वर शहरात किमान तापमान सातत्याने 8 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. संध्याकाळनंतर हा पारा आणखी घसरतो आहे. परिणामी, शहर व परिसरात प्रचंड गारवा जाणवत असून अनेक ठिकाणी नागरिक व पर्यटक शेकोट्यांचा आधार घेत उब मिळवताना दिसले. थंडीमुळे महाबळेश्वरचे निसर्गरम्य रूप अधिक खुलून दिसत आहे. वेण्णा लेक परिसर, लिंग मळा परिसर आणि शहरातील विविध भाग सकाळच्या वेळी चांगलेच गारठले होते.
काही भागांत जमिनीवर दवबिंदू गोठून पांढरे हिमकण तयार झाले. वेण्णा लेकवरील बोटींच्या लोखंडी जेट्टीवरही हिमकणांची चादर पसरली होती. अनेक वाहनांच्या टपांवरही हिमकण तयार झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. हे हिमकण पाहण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक गर्दी करत आहेत. हिवाळ्याच्या हंगामात नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक फेरफटका मारत आहेत. शहरात फिरणारे पर्यटक ऊनटोप्या, शाली, स्वेटर्स आणि जर्किन्समध्ये स्वतःला लपेटून थंडीची मजा लुटताना दिसत आहेत. हवामानाचा हा कडाका आणखी काही दिवस कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात हिमकण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.