

महाबळेश्वर : वर्षातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. यामुळे राज्याचे नंदनवन व हिलस्टेशन असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. दिवाळी हंगामाला प्रारंभ झाला असून महाबळेश्वरमधील प्रसिध्द वेण्णालेकसह सर्वच पॉईंटसला जत्रेचे स्वरूप आले आहे. नौकाविहारासाठी रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये दिवाळी, नाताळ व मे महिन्याच्या हंगामामध्ये पर्यटकांची वर्दळ असते. परंतु, यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मे महिन्यातील हंगामाचे गणित बिघडले. शहरासह तालुक्यात आता कुठे पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवाळी हंगामाआधी साफसफाई स्वच्छतेची कामे रंगरंगोटीची कामे उरकली आहेत. हॉटेल व्यवसायिकांसह स्थानिक दुकानदारांनी आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. दिवाळी हंगामासाठी महाबळेश्वरवासिय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. दिवाळीची सुट्टी सुरु झाल्याने गुलाबी थंडी आणि निसर्ग सौंदर्य न्याहळण्यासाठी महाबळेश्वरकडे पावले वळू लागली आहेत.
महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण, नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकसह परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. थंड आल्हाददायक वातावरणात पर्यटक नौकाविहार करत आहेत. आकर्षक सेल्फी पॉईंट पर्यटकांसाठी केंद्र बिंदू ठरत आहेत. तासन्तास पर्यटक वेण्णालेक परिसरात रेंगाळत आहेत. अनेक हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेस्वारीचा आनंद लुटत आहेत. वेण्णालेकवर बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम सुरु असून जणू जत्रेचाच माहोल निर्माण झाला आहे. खवय्यांसाठी स्ट्रॉबेरी पासून बनवलेली विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी यासह विविध खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत.
पर्यटकांमुळे मुख्य बाजारपेठा सजल्या असून पर्यटक हमखास खरेदीसाठी बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. येथील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली, प्रसिद्ध फज खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल आहे.