

सातारा : महाबळेश्वर येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकारी व ऑपरेटर या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर बुधवारी सायंकाळी ही कारवाई झाली. त्यामुळे महाबळेश्वर व साताऱ्यात खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणात ग्रामसेवकाला अतिरिक्त चार्ज देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. यामुळे तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार दिली. एसीबी विभागात तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. लाचेची रक्कम बुधवारी स्वीकारली जाणार असल्याने एसीबी विभागाने सापळा लावला.
महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये लाचेची रक्कम घेताना दोघांना एसीबीने रंगेहाथ पकडले. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, एसीबीचा ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महाबळेश्वरात खळबळ उडाली. एसीबी विभागाने दोघांना ताब्यात घेवून पंचनामा करण्यास सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.