Mahabaleshwar News : महाबळेश्वरची बकाल शहराकडे वाटचाल

अधिकाऱ्यांचे ठेकेदारधार्जिणे धोरण कारणीभूत : स्वच्छतागृहांची ऐशी की तैशी
Mahabaleshwar News
महाबळेश्वर शहरात अशी अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. 2) अनेक स्वच्छतागृहांची रोज स्वच्छता न केल्याने दुर्गंधी पसरत आहे.
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन आणि देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या ‌‘स्वच्छ महाबळेश्वर, सुंदर महाबळेश्वर‌’ या संकल्पनेची पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ठेकेदारधार्जिणे भूमिकेमुळे आणि गलथान कारभारामुळे अक्षरशः धूळधाण उडाल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि गल्ली मोहल्ल्यांत कचऱ्याचे ढिगारे साचलेले असतानाच आता सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे ‌‘स्वच्छ महाबळेश्वर‌’ऐवजी ‌‘अस्वच्छ, बकाल महाबळेश्वर‌’कडेच वाटचाल सुरू आहे.

Mahabaleshwar News
Mahabaleshwar Tourism : वेण्णा लेक, लिंग मळा परिसरात हिमकणांची चादर

‌‘वरून कीर्तन आणि आतून तमाशा‌’ ही म्हण अनेकदा उपहासात्मक अर्थाने वापरली जाते. या म्हणीचा प्रत्यय महाबळेश्वर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे पाहिल्यानंतर येतो. नववर्ष पर्यटन हंगामात हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, ठेकेदारांची अनास्था व कार्यक्षमतेचा अभाव यामुळे सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी आणि सोयी-सुविधांचा अभाव दिसून आला. सर्व प्रकारचे कर भरूनही पर्यटकांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात पालिका अपयशी ठरत आहे. निवडणुका जरी आता झाल्या असल्या तरी प्रशासन प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी जी कामे करणे अपेक्षित होते त्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. स्वच्छता ठेकेदाराशी लागेबांधे असल्याने त्यांनी महाबळेश्वरकरांना वाऱ्यावर सोडले आहे. किमान आता नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांचा हा कामातील हलगर्जीपणा थांबवून स्वच्छतेबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये प्रवेश करतानाच वेण्णालेक येथील प्रवासी व प्रदूषण कर नाक्याच्या मागील बाजूस असलेले एकमेव स्वच्छतागृह हंगामात अपुरे पडते. बाहेर मोठ्या रांगा, सांडपाणी वाहणे आणि तीव्र दुर्गंधी यामुळे येथे उभे राहणेही मुश्किल होते. महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना अन्य पर्याय नसल्याने अनेकवेळा जंगल परिसराचा आधार घ्यावा लागतो. पुरुषांनाही अशीच वेळ येत असल्याने ही पर्यटननगरीची शोकांतिका ठरत आहे. बस स्थानकातील स्वच्छतागृहांची वेळेवर साफसफाई होत नसून तेथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. रे गार्डनमधील स्वच्छतागृहांची अवस्था इतकी वाईट आहे की पर्यटक शिव्यांची लाखोली वाहताना दिसतात. परिणामी पर्यटकांना जवळच्या हॉटेल-रेस्टॉरंट्सचा आधार घ्यावा लागतो.

मुख्य बाजारपेठेतील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मस्जिद रोड आदी ठिकाणी बोटावर मोजण्याइतकीच स्वच्छतागृहे आहेत. मात्र त्यांचीही वेळेवर स्वच्छता होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरते. मस्जिद रोडवरील स्वच्छतागृह सध्या बंद अवस्थेत असून त्याठिकाणी दुचाकींचे वाहनतळ बनले आहे. गवळी मोहल्ला व रामगड येथील स्वच्छतागृहांमध्ये दारे-खिडक्या, पाईप व भांड्यांची पुरती वाट लागली आहे. बाहेरून चकचकीत दिसणारी ही स्वच्छतागृहे आत मात्र घाणीने माखलेली, पिचकाऱ्यांचे डाग, तुटलेले पाईप आणि उग्र दुर्गंधीने भरलेली आहेत. त्यामुळे नागरिक व पर्यटक नाक दाबून ये-जा करताना दिसत आहेत.

बाजारपेठेतील व्यापारी अनेकदा महिला पर्यटकांची अडचण लक्षात घेऊन खासगी स्वच्छतागृह वापरण्यास परवानगी देतात. गरज पडल्यास पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहही उपलब्ध करून दिले जाते. मात्र हे कायमस्वरूपी उपाय नाहीत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार सुस्त झाले असून देखभाल-दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. ‌‘स्वच्छ महाबळेश्वर, सुंदर महाबळेश्वर‌’ हे फक्त घोषवाक्य राहणार की प्रत्यक्षात अंमलात येणार? पालिकेच्या अखत्यारीतील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था हीच बकाल महाबळेश्वरचे द्योतक ठरत आहे.

Mahabaleshwar News
Mahabaleshwar tourism: नाताळमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news