सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवेळी लेझर बीम, बीम लाईटसह डोळ्यांना त्रासदायक ठरतील अशा लाईटस् वापरायला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले असून कोणीही त्याचा वापर केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचा माहौल दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दुसरीकडे सहाव्या दिवसांपासून विसर्जनालाही बहुतांशी ठिकाणी सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशीला व त्याच्या आदल्या दिवशी सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सर्वाधिक मोठ्या असतात. गेल्या काही वर्षांपासून झगमगाट करणार्या व डोळ्यांना तीव्र स्वरुपाच्या जाणवतील अशा लाईटस्चा वापर विसर्जन मिरवणुकीत वाढला आहे. कोल्हापूर येथे अशा लाईटस्मुळे एका पोलिसासह अनेकांच्या डोळ्यांना हानी झाल्याने सातारा जिल्हा अलर्ट झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेश विसर्जन
मिरवणुकीत डोळ्यांना इजा होतील अशा लाईट्सच्या वापरावर शुक्रवारी बंदी घातली. त्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळे प्लाझामा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करतात. यामुळे अपघाताची शक्यता बळावते. तसेच या लाईटस्मुळे डोळ्यांनाही इजा होण्याचा धोका आहे. त्यामुळेच यावर बंदी घालण्यात आली आहे. याचा भंग करणार्यावर कारवाई करण्यात येणार आहे.