

Kanher Dam has enough water for two months
सातारा : पुढारी वृत्तसेवा
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट होवू लागली आहे. अनेक ठिकाणी भूजल पातळी घटली आहे. असे असले तरी कण्हेर धरणात मात्र अद्यापही मुबलक पाणीसाठा आहे. कडक उन्हाळ्यात दोन महिने पुरेल एवढे पाणी धरणात आहे. सध्याच्या घडीला धरणात तब्बल ४२ टक्के पाणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा तापमानाचा पारा वाढल्याने जनजीवन होरपळून गेले आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. मे महिन्याला सुरूवात झाल्यानंतर अनेक धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होवू लागला आहे. तसेच बहुतांश ठिकाणी विहिरी आटू लागल्या असून भूजल पातळीही घटली आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाण्याची चणचण जाणवू लागली आहे.
यंदाचा उन्हाळा खूपच तीव्र होता. महाराष्ट्रातील अनेक शहराच्या तापमानात यंदा खूप वाढ झाल्याचे दिसून आले. वाढल्या उष्म्याने नागरिकांना हैराण केले होते. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमानात काहीशी घट होत असल्याचे दिसून येत आहे.