

सातारा : नेहमीच वर्दळ असणाऱ्या सातारा येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडले आहेत. तसेच अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच कार्यालय परिसराचा उकीरडा झाला आहे.
सातारा येथील आरटीओ कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालक व नागरिकांची नेहमीच गर्दी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कार्यालयाला बेरंग आला आहे. कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे काम करत आहेत. त्यामुळे कार्यालयाचे तीनतेरा वाजले आहेत. आरटीओ कार्यालय परिसर तर उकीरडाच झाला आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीगच्या ढीग मोठ्या प्रमाणात साचले आहेत. अस्ताव्यस्त कचरा सर्वत्र पसरला आहे. ठिकठिकाणी मावा, गुटख्यांच्या पिचकाऱ्याच पहावयास मिळत आहेत. परिसर बकाल झाला असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डास व माशांचा वावर वाढला आहे. कार्यालयातील कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालय परिसरात असलेल्या चहाच्या गाडीवाल्याचे मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त कप पडलेले दिसत आहेत. त्यामुळे हे आरटीओ कार्यालय आहे की डंपिंग ग्राऊंड असा प्रश्न कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पडला आहे. वेळच्यावेळी कचरा हटवला जात नाही. त्यामुळेच कार्यालय परिसर कचऱ्याने माखला आहे. ज्या ट्रॅकवर वाहनांची चाचणी घेतली जाते तो ट्रॅकही कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. अनेक नागरिक कार्यालयाची बकाल अवस्था पाहून नाराजी दर्शवत आहेत.
या सर्व गोष्टीला कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात चांगलाच सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाच आता हातात झाडू घेण्याची वेळ आली आहे.