

सातारा : पुढारी वृत्तसेवा
संघर्षयोद्धा मनोज जरांगे फॅक्टरची प्रचिती लोकसभेला मराठवाड्यात तर आलीच, याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यातही प्रत्यय याचा आला. त्यानंतर विधानसभेला मराठा समाजातील उमेदवार उभे करण्याची घोषणा जरांगे यांनी केली. आंतरवाली येथे विधानसभेबाबत इच्छुक उमेदवारांची बैठक गुरुवार दि. 24 रोजी बोलावली असून त्यावेळी निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा समाजबांधवांचेही लक्ष आंतरवालीतील बैठकीकडे लागले आहे.
मराठा आरक्षणाबाबत आचारसंहिता लागेपर्यंत निर्णय न झाल्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे. त्यामुळे सत्ताधार्यांबाबत विधानसभेला काय निर्णय घ्यायचा? याबाबत जरांगे यांनी भूमिका स्पष्ट करत लढा आणि पाडा अशी घोषणा रविवारी आंतरवाली येथे झालेल्या बैठकीत केली. या अनुषंगाने राज्यासह जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे इच्छुकांना दि. 24 रोजी आंतरवालीत चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चातील कोणीही समन्वयकाने अर्ज केला नसल्याची माहिती आली असून त्यातूनही इच्छुक कोण भेटीला जाणार याकडे लक्ष लागले आहे. दि. 20 रोजीच्या जरांगे यांच्या निर्णयानंतर महत्त्वाची बैठक झाली त्यात राज्यात ज्या मतरदारसंघात मराठा समाजाची ताकद आहे तिथं मराठा निवडून येऊ शकतो, त्याठिकाणी उमेदवारी द्यायची. ज्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद कमी आहे तिथं मराठा आरक्षण विरोधी उमेदवाराला पाडायचे. लढायचं पण पाडायचं पण आणि समाजाची मान उंच राखायचे पण ठरले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानणार्या टीम जरांगे राजधानीत इच्छुकांनी घोंगडी बैठका सुरू केल्या आहेत. त्यांनाही दि. 24 रोजीच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांची सातार्यात सभा झाली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लोकसभेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार न देता त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच विधानसभेला सातारा-जावली मतदारसंघाचे उमेदवार हे छत्रपती गादीचे वारसदार आहेत त्यांच्याविरोधात उमेदवार नाही देणार, असे स्पष्ट सांगितले होते.