

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि.14) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झालेली नाही. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी होणार, त्या शिवाय ते आचारसंहिता लावणार नाहीत. नारायण गडावरचा दसरा मेळावा बघून त्यांचे डोळे उघडले असतील. मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता. पण आता मुस्लीम, दलित, गोरगरिब ओबीसीदेखील विरोधात आहेत असे मनोज जरांगे म्हणाले.
सरकारच्या विरोधात साडेतीन कोटी समाज गेला आहेत. मी शंभर टक्के सांगतो ते कॅबिनेट घेणार आहेत. मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहेत. मराठ्यांवर ते अन्याय करणार नाहीत. ज्यांची मागणी नाही त्या पंधरा जातींना मराठ्यांच्या नाकावर टिचून आरक्षण दिले आहे असे ही मनोज जरांगे म्हणाले.
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीवरही जरांगेंनी भाष्य केलं. भाजप, शिवसेना, काँगेस आणि शिवसेना यांच्या विरोधात मराठा गेला आहे. आरक्षण दिले नाही तर यांचे पूर्ण पाडतो, यांना अस्मान दाखवणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सांगतो आम्हाला राजकारण करायचे नाही. खुर्च्या तुम्हीच सांभाळा. तुमची मजा तुम्हीच करा. मराठ्यांच्या विरोधात फडवणीस यांनी जाऊ नये. नाहीतर मराठा समाज तुम्हाला असमान दाखवल्या शिवाय राहणार नाही असे जरांगे म्हणाले.