

सातारा : सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी लग्न वरातीमध्ये डीजे, लाईट लावून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी शाहूपुरी व शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. लग्नाच्या वरातीत मोठ्या आवाजत डीजे लावल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीजे चालक हर्षद नितीन साळुंखे (वय 21, रा. गोडोली, सातारा), ट्रॅक्टर चालक विपुल सोमराव पाटील (वय 34, रा. बोरखळ ता.सातारा), लाईट सिस्टीम चालक प्रथमेश चंद्रकांत इंगळे (वय 22, रा. लावंघर ता.सातारा) व अमोल संजय किर्दत (रा.रामकुंड, सदरबझार, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस दिपक पोळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दि. 22 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा रस्त्यावरील रामकुंड येथे केली आहे. लग्नाची वरात सुरु असताना डीजे जोरदार सुरु होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली.
दुसरा गुन्हा अधिक जगन्नाथ चव्हाण (रा.कोडोली, सातारा), अनिकेत भालचंद्र उंबरे (रा.कोडोली) व सचिन माणिक जाधव (रा. कोडोली) या तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा ते रहिमतपूर रोडवर विनापरवाना मिरवणूक काढून डीजे मोठ्या आवाजात लावत इतर वाहनांना अडथळा झाला. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर पोलिस सागर निकम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दि. 22 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.