

चाफळ : चाफळ विभागातील नाणेगाव येथे गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक शेतकरी अर्जुन पाटील, संभाजी पाटील, शंकर पाटील, सर्जेराव पाटील यांच्या शेतातील सुमारे चार एकर क्षेत्रातील शाळू पिकांचा सोमवारी मध्यरात्री गव्याच्या कळपाने अक्षरशः उच्छाद मांडत पिकाचे मोठे नुकसान केले. काही महिन्यांपासून मेहनत घेऊन उभे केलेले पीक एका रात्रीत नष्ट झाल्यामुळे पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अर्जुन पाटील यांनी सांगितले की, हजारो रुपयांचे बियाणे, खत, दिवस-रात्र केलेली मेहनत यामुळे यंदा शाळू पिकाची चांगली वाढ झाली होती. परंतु सोमवारी रात्री गव्याच्या कळपाने संपूर्ण शेतात धुडगूस घालत पीक आडवे केले. उभे पीक खाऊन व मोडून टाकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे भातासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकरी अजूनही कर्जबाजारीपणातून सावरत नाहीत तोच आता रब्बी हंगामातही गवरेड्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून हंगामाचा खर्च निघणे कठीण झाले आहे.
नाणेगाव परिसरात गव्यांचा उपद्रव मागील काही दिवसांत लक्षणीय वाढल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. रात्रीच्या वेळी शेतात फिरणाऱ्या गव्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. वनविभागाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना न झाल्याची तक्रारही शेतकरी करत आहेत.
अर्जुन पाटील यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आम्ही मेहनतीने उभे केलेले पीक एका रात्रीत गव्यांनी उद्ध्वस्त केले. शासनाने तातडीने पंचनामा करावा, असे पाटील यांनी सांगितले.
परिसरातील शेतकरी बांधवांनीही गव्यांच्या उपद्रवाबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, रात्री गस्त वाढवावी आणि शेतापर्यंत सुरक्षितता उपाय करता यावेत अशी मागणी केली आहे. वनविभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.