

तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव जवळील मॅग्नेशिया केमिकल्स कंपनीच्या गोडाऊनला गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाढल्याने संपूर्ण परिसर दाट धुराच्या लोटांनी भरून गेला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गोडाऊनमधील कंपनी साहित्य, कच्चा माल तसेच काही वाहने या आगीमध्ये भस्मसात झाली आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाने तपास सुरू केला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेदरम्यान कंपनीतील अग्निशमक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.