

नाशिक : गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरातील श्री नवश्या गणपती मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराची ख्याती आहे. मंदिराला पेशवेकालीन इतिहास आहे.
१७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. १५-२० वर्षांपूर्वी मंदिराजवळ आनंदीबाईंच्या गढीचेही अवशेष होते. आता केवळ मंदिर आहे आणि बाकी परिसर इमारतींनी भरला आहे. तरीही इथली प्रसन्न शांतता आणि पावित्र्य टिकून आहे. गोदाकाठी पूर्वाभिमुख गणेश मंदिर आहे. प्रशस्त सभामंडप, सभामंडपात दोन्ही बाजूला अष्टविनायक, त्यापुढे छोटे गर्भगृह, गर्भगृहाला घुमटाकार शिखर अशी मंदिराची रचना आहे. डोक्यावर मुकुट असलेली 'श्रीं'ची मूर्ती चतुर्भुज असून, त्यापैकी वरील दोन्ही हातात पाश आणि फुले आहेत, तर खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत असून, मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीदार मखर आहे. नवसपूर्तीचा भाग म्हणून येथे छोट्या-छोट्या घंटा लावल्या जातात, त्यामुळे सभामंडपाचे खांब अनेक घंट्यांनी भरून गेले आहेत. सभोवताली गर्द झाडी, लागूनच नदीपात्र आणि नीरव शांतता यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांनाही हे स्थळ आकर्षित करते.