

कराड : विधानसभा निवडणुकी दरम्यान तालुक्यातील कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाले असल्याचा आरोप उपोषणकर्ते गणेश पवार यांनी केला आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कोणतीही चौकशी न करता बोगस मतदारांना पाठीशी घातले आहे. दिलेले पुरावे तपासण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी व बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
कराड दक्षिण मधील बोगस मतदारांविरोधात तहसील कार्यालयासमोर गणेश पवार यांनी 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी भेट देऊन चर्चा न केल्यामुळे पवार यांनी नाराजी व्यक्त केली. गणेश पवार म्हणाले, कापिल व गोळेश्वर येथील मतदार नोंदणी प्रक्रियेत केवळ आधार कार्डावरूनच नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. काही मतदारांचे रेशन कार्ड परजिल्ह्यातील असून, त्यांना जोडलेली वीजबिलं मात्र इतरांची असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, ज्या मतदारांची नावे त्यांच्या मूळ गावातील मतदार यादीत होती, ती नावे अजून कायम असूनही विधानसभा यादीत तीच नावे समाविष्ट केली गेली आहेत.त्यामुळे ही सर्व नावे बोगस असल्याचे स्पष्ट पुरावे पवार यांनी सदर केले. या संपूर्ण प्रक्रियेत कापिल येथील 9 व गोळेश्वर येथील तब्बल 75 असे एकूण 84 मतदार बोगस असल्याचे पवार यांनी सांगितले. ग्रामपंचायत व लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये यांची नावे नव्हती. मात्र केवळ चार महिन्यांत विधानसभा यादीत त्यांची नावे कशी आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माहिती अधिकाराखाली निवडणूक नोंदणीची कागदपत्रे मागितली असता, फक्त आधार कार्ड व्यतिरिक्त इतर कोणतेही आवश्यक कागदपत्र देण्यात आलेले नाहीत. ती कागदपत्रे असतील, तर त्यांनी सादर करावीत, अशी मागणी त्यांनी केली.