कराड : खेळण्यासाठी घराबाहेर आलेल्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीला आपल्या घरात नेऊन एका युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कराड परिसरातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून नराधम युवकास पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, मंगळवार, दि. 22 जुलैला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीची आई शेजारी आकाडी जेवणाचा कार्यक्रम असल्याने तिथे मदतीसाठी गेली होती. यावेळी तिने आपल्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीला सोबत नेले होते. आई स्वयंपाक बनविण्यात व्यस्त असताना पीडित चिमुरडी खेळण्यासाठी बाहेर गेली. त्याचवेळी संशयित युवकाने चिमुरडीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. काहीवेळाने हा प्रकार चिमुरडीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयिताला पोलिसांनी गजाआड केले.