

म्हसवड :जिल्ह्यासह माण-खटाव मतदार संघात कोणत्याच जि.प गटातून अजून उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या नाहीत. परंतू आज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आंधळी जि.प.गटातून आपण पत्नी सौ.सोनलताई गोरे यांची उमेदवारी जाहीर करत आहोत. ती उमेदवारी कमळ चिन्हावरच असेल, असे प्रतिपादन माण-खटावचे नेते व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी केले.
आंधळी, ता. माण येथे गटातील कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विविध गावचे पदाधिकारी, सरपंच,चेअरमन, सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंधळी गटातील विविध गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेखरभाऊ गोरे गटात जाहीर प्रवेश केला. शेखरभाऊ गोरे म्हणाले, माण-खटाव मतदारसंघात आपण व ना.जयकुमार गोरे जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत कोणाचीच उमेदवारी निश्चित होणार नव्हती. परंतू तुमच्या आग्रहाखातर आज आंधळी गटाची उमेदवारी निश्चित करावी लागतेय. गटातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन आज प्रवेश केलाय त्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. आता तुम्ही आपल्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळे तुमच्या पाठीमागे मी आहे. कोणाला घाबरण्याची गरज नाही. तुमच्या गावातील विकासकामासाठी, तुमच्या सेवेसाठी तसेच तुमच्या विविध कामांसाठी आपण कायम कटिबद्ध राहू.
शेखरभाऊ गोरे म्हणाले, म्हसवड नगरपालिकेत दोन दिवसात तयारी करुन 8 नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचा 1 असे 9 उमेदवार उभे केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती करत शेखरभाऊ आम्ही तुम्हाला आमदार करतोय. तसेच लढायचं असेल तर कमळ चिन्हावर लढा, असे ते बोलले. जयाभाऊ पण आपल्याला चिन्हावर लढणार असाल तर जागा देण्यास तयार होते. मात्र आपण आताच चिन्हावर लढणार नव्हतो. त्यामुळे उमेदवारांशी बोलून चर्चा केली. त्यावेळी सर्वांनी सांगितले की, भाऊ आपल्याला आमदारकी मिळणार असेल तर आम्ही माघार घेतो म्हणत सर्व अर्ज माघारी घेतले होते. आपल्या गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैभव मोरे म्हणाले, मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उर्वरित कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, फार वाट बघत बसू नका. तुम्हीही शेखरभाऊंच्या गटात सामील होऊन आपल्या राजकीय, सामाजिक कार्याला संधी द्या. भाऊ या गटातून सौ. सोनलताईंची उमेदवारी द्या आम्ही सर्व मिळून जिल्ह्यातील एक नंबरच्या मताधिक्याने त्यांना निवडून आणू.
सिध्दनाथ पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव म्हणाले, आज जनतेच्या या उपस्थितीने गटात केलेल्या कार्याची पोचपावती मिळाली. भाऊ आम्हाला फक्त तुम्हाला आमदार झालेल बघाचय. तुम्ही तीन खासदार केलेत. तुम्ही ज्यांना मदत करता त्यांना गुलाल मिळालाय हा इतिहास आहे. आता आपल्या सौ.सोनलताईंना संधी द्या, अशी सर्वांची मागणी आहे.
रमेश शिंदे म्हणाले, भाऊ तुम्ही याअगोदर राष्ट्रवादीचं नेतृत्व केले आहे. त्यावेळी तुमचा स्वभाव, दातृत्व, नेतृत्व आम्ही पाहिलंय.असा नेता कुठेच मिळणार नाही. सध्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांची स्थानिक, प्रशासकीय, तालुका, जिल्हा पातळीवर काम होत नाहीत. तिकडे खमक्या नेतृत्वाचा अभाव असल्यानेच आम्ही तो पक्ष सोडून तुमच्या पाठीशी आलोय. सोनलताईंची उमेदवारी जाहीर करा त्यांना निवडून आणण्याची जबाबादारी आमची राहील. प्रास्तविक सुनिल काळे यांनी केले. सूत्रसंचलन कोळी यांनी केले. आभार संतोष काळे यांनी मानले.