

सातारा : सातारा पालिका निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे बहुतांश प्रभागातील जागांवर एकमत झाले आहे. दोन्ही राजे गटांना 22-22 जागा देऊन 6 जागा मूळ भाजपला सोडण्यावर खल सुरू होता. संभाव्य उमेदवारांची यादी तयार असून त्यांना निवडणूक अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते. तसेच नगराध्यक्षपदावरून रविवारी दिवसभर दोन्ही राजेंमध्ये बैठका सुरू होत्या; मात्र त्यावर एकमत न झाल्याने नगराध्यपदाच्या उमेदवारांची नावे भाजप प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात आली असली, तरी दोन्ही राजांचे समर्थक नगराध्यक्षपदासाठी सोमवारी स्वतंत्र अर्ज भरण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला जाण्याची दाट शक्यता आहे.
सातारा पालिकेत राजकारण निर्णायक वळणावर पोहोचले आहे. गेल्या आठ दिवसांपासून खा. उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यात वाटाघाटीच्या अनेक बैठका पार पडल्या; मात्र दोन्ही नेत्यांच्या मनासारखा तोडगा निघाला नाही. त्यामुळे अनेक बैठका निष्फळ ठरल्या. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपत आल्यामुळे अडचणीच्या जागेवर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. रविवारी दोन्ही नेत्यांची वाढे फाटा चौकातील एका हॉटेलवर बैठक झाली. त्यामुळे दोन्ही राजेंचे काही प्रभागातील जागांवर एकमत झाले. दोन्ही राजेंनी प्रत्येकी 22-22 जागा दोन्ही गटाकडे ठेवून मूळ भाजपला 6 जागा देण्याचे मान्य केले आहे. तसेच ज्या ठिकाणी दोन्ही राजेंचे एकमत झाले त्याठिकाणच्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्याचे आघाड्यांच्या गोटातून समजते. जागा वाटपात राजेंच्या दोन्ही गटांनी बार्गेनिंग पॉवर वापरली असून समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र चर्चेतून अनेक प्रभागांतील तिढे सोडवत असताना काही जागांवर खैंदुळ कायम आहे. काही प्रभागात दोन्ही गटाचे ताकदीचे उमेदवार एकत्र असल्यामुळे तिकीट कुणाला द्यायचे असा पेच निर्माण झाला. काही ठिकाणी जुना व अनुभवी उमेदवाराविरुद्ध नवा उमेदवार, काही प्रभागात दोन्ही नवे उमेदवार असले तरी निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत अशी परिस्थिती असल्यामुळे दोन्ही राजेंपुढे बाका प्रसंग निर्माण झाला आहे.
अडचणीच्या जागांवर रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांमध्ये बैठक सुरू होती. काही ठिकाणी ऐनवेळी उमेदवार रिप्लेस करुन नवा चेहरा देण्याचाही प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. प्रभागातील जागांच्या या वाटाघाटीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करुनही बऱ्याचजणांना अद्याप संधी न मिळाल्याने अशा इच्छुकांमध्ये अद्याप धाकधूक वाढली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे इच्छुकांना ऐनवेळी निरोप दिले जाण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री उशीरापर्यंत हॉटेल फर्न येथे उमेदवारांकडून अर्ज भरूनघेतले जात होते. यावेळी इच्छुकांनी गर्दी केली होती.
प्रभागांतील जागांवर एकमत होत असताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर मात्र दिवसभर चर्चा सुरू होत्या. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर शेवटपर्यंत शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदी कोणाचा व कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय मुंबईत पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. नगराध्यक्षपदाचा उमेदवार सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पदासाठी अविनाश कदम, काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे व जयेंद्र चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. नगराध्यक्षपदासाठी कुणाचे नाव अंतिम होतंय याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्र. 1, 2, 3 आणि 21 या प्रभागात ट्विस्ट निर्माण झाले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन जागा असल्या तरी एकास एक उमेदवार देण्यात येत आहेत. काही प्रभाग स्वतंत्र आघाडीसाठीही सोडण्यात आले आहेत. राजे गटाकडून उमेदवाऱ्या अंतिम होत असताना काही प्रभागात मात्र एकमत झाले नाही. कोणच माघार घेत नसल्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न दोन्ही नेत्यांना पडला आहे.