Satara Politics: सातारा पालिकेत सत्ता भाजपची पण वर्चस्व कुणाचे?

दोन्ही राजेंच्या भूमिकेकडे लक्ष; सत्तास्थापनेसाठी पुन्हा सुप्त संघर्ष?
Udayanraje Shivendraraje Politics
Udayanraje, Shivendraraje(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सातारा : सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल केवळ नगरपालिकेतील सत्ता वाटपापुरता मर्यादित न राहता, साताऱ्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातील अंतर्गत प्रवाह, गटबाजी, मतदारांचा बदललेला दृष्टिकोन आणि भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करणारा ठरला आहे. वरवर पाहता भाजपची सत्ता अबाधित राहिली असली तरी या सत्तेवर नेमके नियंत्रण कुणाचे, हा प्रश्न अधिक ठळकपणे पुढे आला आहे. निवडणुकीनंतर दोन्ही राजे काय भूमिका घेतात याकडे सातारकरांचे लक्ष आहे.

सातारा पालिकेसाठी भाजपांतर्गत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले गट व ना. शिवेंद्रराजे भोसले गट यांच्या जागावाटपाचे समानसूत्र ठरले होते. त्यानुसार 50 जागांपैकी उदयनराजे गटाला 22, शिवेंद्रराजे गटाला 22 आणि मूळ भाजपासाठी 6 जागा देण्यात आल्या. मात्र हे सूत्र कागदावरच समतोलाचे वाटप असले तरी प्रत्यक्ष निकालाने गटबाजीची असमतोल रेषा अधोरेखित झाली. उदयनराजे गटाचे अधिकृत 19 व 8 अपक्ष असे एकूण 27 उमेदवार विजयी झाले. या गटाचे 3 अधिकृत उमेदवार पराभूत झाले, मात्र त्यापैकी दोन जागांवर उदयनराजेंचेच बंडखोर निवडून आल्याने मर्यादित नुकसान झाले. या गटाच्या एका जागेवर शिवेंद्रराजे गटाच्या अपक्षाने बाजी मारली.

दुसरीकडे ना. शिवेंद्रराजे गटाचे 17 अधिकृत आणि 1 अपक्ष असे एकूण 18 उमेदवार विजयी झाले. या गटाचे पाच अधिकृत उमेदवार पराभूत झाले आणि विशेष म्हणजे या सर्व जागांवर उदयनराजे गटाच्या अपक्षांनी वर्चस्व मिळवले. मूळ भाजपला मिळालेल्या 6 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र एका जागेवर उमेदवार दिला गेला नाही. त्यामुळे भाजपच्या 5 जागांपैकी 4 जागा निवडून आल्या तर एक जागा गमवावी लागली. शिवेसना (एकनाथ शिंदे गट) केवळ एक जागा मिळवत पालिकेत चंचूप्रवेश करू शकली.

या निकालातून राजकीय बाबी स्पष्ट झाल्या आहेत. भाजप ही मोठी छत्री असली, तरी तिच्या आत दोन स्वतंत्र सत्ताकेंद्रे कार्यरत आहेत. अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्ष आणि बंडखोरांचे यश हे पक्ष संघटनांसाठी धोक्याची घंटा आहे. मतदारांनी पक्षापेक्षा स्थानिक नेतृत्व, वैयक्तिक लोकसंपर्क, कामाचा लेखाजोखा आणि भावनिक नाळ यांना अधिक महत्त्व दिल्याचे या निकालातून दिसून आले. या निवडणुकीत अनेक प्रभागांत जुने, परिचित नेते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. तरुण उमेदवारांचा अभाव ठळकपणे जाणवला.

संख्याबळाच्या दृष्टीने भाजककडे सत्ता असली तरी प्रत्यक्ष नियंत्रण कोणत्या राजेंचे राहणार याकडे लक्ष लागले आहे. या निकालाने अपक्षांना महत्त्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध विषय समित्यांच्या रचनेत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते. सातारा पालिकेचा निकाल हा इशाऱ्यांचा इशारा आहे. मतदार आता पक्षनिष्ठेपेक्षा कामगिरी, व्यक्तिमत्त्व आणि स्थानिक नेतृत्व पाहत आहेत. भाजपसाठी ही सत्ता टिकवण्याची संधी असली तरी संघटनात्मक शिस्त आणि अंतर्गत नाराजी न मिटवता ही सत्ता सांभाळणे कठिण ठरणार आहे. साताऱ्याच्या राजकारणात पुढील पाच वर्षे ही केवळ सत्तेची नव्हे तर नियंत्रणासाठीची ठरणार हे स्पष्ट झाले आहे.

प्रभागनिहाय जातीय व सामाजिक गणिते

निकालावर जातीय, सामाजिक आणि गावकी-भावकीच्या समीकरणांचा मोठा प्रभाव दिसून आला. काही प्रभागांमध्ये पारंपरिक पक्षीय मते फुटली, तर काही ठिकाणी समाजाचे ध्रुवीकरण निर्णायक ठरले. पक्षांनी उमेदवार ठरवताना या स्थानिक गणितांचा सखोल अभ्यास न केल्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसला. यावेळी प्रचाराची पद्धतही बदललेली दिसली. सोशल मीडियाचा वापर, थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी प्रचारयंत्रणा प्रभावी ठरली. मोठ्या सभा, झेंडे आणि घोषणा यापेक्षा घराघरांत पोहोचणारा संवाद जास्त परिणामकारक ठरला.

काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न

सातारा शहरातील काँग्रेसचे अस्तित्व अंताकडे जात असल्याचे दिसले. या पक्षापासून पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणावर दूर गेले आहेत. संघटनात्मक दुर्बलता, नेतृत्वाचा अभाव आणि स्पष्ट राजकीय भूमिका नसल्याने काँग्रेस शहराच्या राजकारणातून जवळपास बाहेर केली जात असल्याचे चित्र आहे. पुनरूज्जीवनासाठी नव्या नेतृत्वाचा आणि आक्रमक रणनीतीची नितांत गरज असल्याचे दिसून येते.

आघाड्यांशिवाय लढण्याचा प्रयोग यशस्वी की अयशस्वी?

महायुती किंवा महाविकास आघाडीशिवाय स्वतंत्र लढण्याचा प्रयोग साताऱ्यात करण्यात आला. यामुळे मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. काही ठिकाणी त्याचा अपक्षांना फायदा झाला तर काही ठिकाणी पक्षांचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले. हा प्रयोग भाजपसाठी सत्तेच्यादृष्टीने यशस्वी असला तरी मताधिक्य घटण्याच्यादृष्टीने अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे. भाजपच्या अनेक अधिकृत उमेदवारांचे मताधिक्य अपेक्षेपेक्षा कमी राहिले. त्यामागे बंडखोरी, क्रॉस व्होटिंग, स्थानिक नाराजी आणि उमेदवार निवडीत झालेल्या चुका ही प्रमुख कारणे आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकदासाठी वेगवेगळे मतदान झाल्यानेही पक्षीय गणित बिघडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news