Marathi Sahitya Sammelan : ग्रामीण साहित्यात गावाकडचे बदललेले वास्तव गरजेचे

साहित्य संमेलनातील परिसंवादात सूर : शेतकऱ्यांच्या व्यथा संवेदनशीलपणे मांडा
Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan
Published on
Updated on

अजय कदम

सातारा : ग्रामीण जीवन मराठी साहित्याचा आत्मा व प्राण आहे. ग्रामीण साहित्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनातील व्यथा सखोल व संवेदनशीलपणे नमूद करणे आवश्यक असून, गावाकडचे वास्तव्य बदलले; पण गावपण टिकले आहे. ग्रामीण साहित्यामध्ये समाज परिवर्तनाचे मोठे सामर्थ्य आहे, म्हणून गावाकडचे बदललेले वास्तव साहित्यात आले पाहिजे, भौतिकरीत्या बदलल्या गावांमधील अंतरंगाचे वास्तवदर्शी चित्रण आवश्यक असल्याचा असा सूर ‌‘बदलत्या ग्रामीण वास्तव्याचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात का दिसत नाही?‌’ या परिसंवादात उमटला.

Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan : साहित्यिकांच्या स्वागतासाठी माचीगड सज्ज

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, बाल साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील, भगवान काळे, चांगदेव काळे, राजेश शेगोकार यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय होते. दै.‌‘पुढारी‌’चे निवासी संपादक हरीश पाटणे यांनी ओघवत्या, हलक्या व फुलक्या भाषेत फुलवत नेलेला हा परिसंवाद उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. प्रारंभी त्यांनी परिसंवादामधील मान्यवरांचा परिचय करून दिला. सुनीताराजे पवार, प्रदीप दाते यांनी स्वागत केले.

परिसंवादात भूषणकुमार उपाध्याय यांनी मराठी साहित्यात समृद्ध व कल्पक गोष्टी तसेच मर्म असल्याचे नमूद केले. ग्रामीण जीवन मराठी साहित्याचा आत्मा व प्राण असून, येथील शब्द ब्रह्म आहेत. शेतकऱ्यांच्या मनातील मानसिक व्यथा मांडणाऱ्या सखोल साहित्याची आवश्यकता असल्याचे उपाध्याय यांनी प्रकर्षाने मांडले. गावाकडे संवेदनशील व सहानुभूतीने पाहिले पाहिजे. आज गावाकडचे वास्तव बदलले, पण गावपण टिकून आहे. शेती, गावाकडची ओळख निर्माण करणारी साहित्यनिर्मिती महत्त्वाची असून, त्यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत दळवी यांनी अनेक साहित्यिकांनी साहित्यातून ग्रामीण जीवनाचे जिवंत दर्शन दाखवल्याचे सांगताना महाराष्ट्रात सन 2000 नंतर ग्रामीण जीवनाचा प्रवाह खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचे नमूद केले. ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध गाव या योजनांमुळे गावाची संकल्पना पुढे आली. परंतु, गेल्या 25 वर्षांतील ग्रामीण बदलाचे साहित्यामध्ये प्रतिबिंब दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

श्रीकांत पाटील यांनी आज गाव बदलेले तरी ग्रामीण लेखक, कलाकारांनी वास्तववादी लेखन केले असल्याचे प्राधान्याने समोर आणले. मराठी साहित्यात कृषी, सहकार, ग्रामपंचायत राजकारण, सामाजिक, कौटुंबिक स्थिती यांचे साहित्यात चित्रण आहे. आज बैलगाडीच्या जागी ट्रॅक्टर आला, पाणंदच्या जागी कॉक्रिटीकरणाचे रस्ते आले, गाव बदले पण कथाकारांनी त्याकडे कानाडोळा केला नाही. बदलत्या ग्रामीण वास्तव्याचे चित्रण मराठी साहित्यात असल्याचे स्पष्ट केले. चांगदेव काळे यांनी बदलते ग्रामीण वास्तव हे खरोखरच वास्तव आहे का? असा सवाल करत ग्रामीण साहित्य लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली. भगवान काळे यांनी ग्रामीण साहित्य हा सगळ्या साहित्याचा गाभा असून, साहित्यिकांनी गावागावांत होणाऱ्या घटनांकडे संवेदनशीलतेने पाहून लिहिले पाहिजे, असे भाष्य केले.

राजेश शेगोकार यांनी ग्रामीण प्रश्नांवर होत असलेले राजकारण साहित्यात आले पाहिजे, साहित्यिकांनी विविध शासकीय योजनांमधील घोळ, ग्रामीण राजकीयकरणाचे साहित्यात चित्रण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

हरीश पाटणे यांनी या परिसंवादात सहभागी वक्त्यांना ग्रामीण साहित्यातून वास्तवाचे चित्रण उभे करत उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले. साहित्य संमेलनात झालेल्या सर्व परिसंवादांमधील सर्वाधिक गर्दीचा परिसंवाद ग्रामीण साहित्याचा ठरला. हा परिसंवाद ऐकायला आवर्जुन ‌‘पानिपत‌’कार व संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे व्यासपीठावर उपस्थित राहिले, तर ग्रामीण कवी विठ्ठल वाघ, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, अभिराम भडकमकर, स्मिता पाटील, कवयित्री अंजली ढमाळ, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक श्रोत्यांमध्ये बसून होते.

काळजातील कळ साहित्यात मांडा : विश्वास पाटील

संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी ग्रामीण साहित्य हा माझ्या आवडीचा विषय असून, ग्रामीण साहित्यात नवे प्रयोग करणारे आज अनेक साहित्यिक आहेत. ग्रामीण वास्तव पकडण्यामध्ये साहित्यिक कमी पडत आहेत. ग्रामीण कथाकारांनी काळजातील कळ साहित्यात मांडावी, असे आवाहन केले.

Marathi Sahitya Sammelan
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: रहस्य, भय कथांना स्वतंत्र साहित्याचा दर्जा मिळावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news